

मांडवगण फराटा, ता. १३ : शिरूर तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना घोड नदीवरील सहा कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये अद्याप पुरेसा पाणीसाठा नसल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विहिरी-बोअरवेल आटल्या असून, पावसाळ्यात लागवड केलेली पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर घोड धरणातून ३५० एमसीएफटी पाणी सोडून सहाही बंधारे भरण्याची मागणी आमदार माउली कटके यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली.
शिरूर तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांसमोर पिके जगविण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. पाण्याअभावी पिके हातची जाण्याची भीती निर्माण झाली असून, शेतीसाठी पाणी उपलब्ध नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक गावांमध्ये विहिरी आणि बोअरवेल आटल्याने पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होत आहे. त्यामुळे घोड नदीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडण्याची मागणी जोर धरत आहे.
घोड धरणाच्या खालच्या बाजूस नदीवर सहा कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. शिरसगाव, पिंपळसूटी, इनामगाव, गांधले मळा, तांदळी, तसेच परिसरातील वाड्या-वस्त्यांमधील नागरिकांची शेती आणि पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी हे बंधारे महत्त्वाचे आहेत. मात्र, बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा नसल्याने या परिसरातील पाणीटंचाई अधिकच गंभीर बनली आहे. आमदार कटके यांनी १२ ऑक्टोबर रोजी जलसंपदामंत्र्यांना पत्र पाठवून परिस्थितीचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले आहे. घोड धरणातून ३५० एमसीएफटी पाणी सोडून नदीवरील सहाही बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.