

वर्ध्यातील २५३ गावांत पाणीटंचाई
----
टंचाई निवारणासंदर्भात प्रशासनाकडून ३६ कोटींचा संभावित कृती आराखडा तयार
----
ॲग्रोवन वृत्तसेवा
वर्धा : उन्हाळ्याचा कडाका वाढू लागताच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील तब्बल २५३ गावांना टंचाईची झळ पोहोचत असून, प्रशासनाने यावर मात करण्यासाठी अंदाजित ३६ कोटी रुपयांचा पाणीटंचाई निवारण कृती आराखडा मंजूर केला आहे. दिलासादायक बाब म्हणजे सद्यःस्थितीत जिल्ह्यात कुठेही टँकर सुरू करण्याची वेळ आलेली नाही.
जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये आतापर्यंत ६९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या विहिरींच्या माध्यमातून गावकऱ्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच पाणीपातळी खालावलेल्या ४४ गावांमधील विहिरींचे खोलीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, जेणेकरून उपलब्ध जलस्रोतांतून अधिक पाणी मिळू शकेल. जिल्ह्यात गत काही दिवसांपासून पारा वाढला आहे. अशात असलेल्या जलसाठ्यावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात यंदाचे सर्वाधिक तापमान ४६.४ एप्रिल महिन्यातच नोंदविण्यात आले आहे. अद्याप मे आणि जून महिना शिल्लक असल्याने नागरिकांच्या मनात चांगलीच भीती निर्माण झाली आहे. या वाढत्या तापमानाचा जलाशयांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाल्यास शासनाकडून त्यावर उपाययोजना आखण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
नळ योजनांच्या दुरुस्तीसाठी १७ कोटी
गावागावांत असलेल्या जुन्या आणि नादुरुस्त नळ पाणीपुरवठा योजनांमुळे पाणी असूनही नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागतो. ही अडचण दूर करण्यासाठी प्रशासनाने विशेष पाऊल उचलले आहे. नळ पाणीपुरवठा योजनांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी १७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून पाइपलाइन दुरुस्ती, पंप बदलणे आणि इतर तांत्रिक कामे पूर्ण केली जाणार आहेत.
टँकर अद्याप ‘वेटिंग’वर
पाणीटंचाई निवारणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांसाठी एकूण ३६ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. विहीर अधिग्रहण आणि नळ योजनांच्या दुरुस्तीमुळे आतापर्यंत एकाही गावात टँकरची गरज भासलेली नाही. मात्र परिस्थिती बदलल्यास प्रशासन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.