पुण्यातील 'या' परिसरातील पाण्याचे वेळापत्रक अजूनही कोलमडलेलेच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

शिवाजीनगर आणि परिसरात गेल्या चार महिन्यांपासून कोलमडलेले पाण्याचे वेळापत्रक अजूनही पूर्ववत झाले नाही. 

पुणे - शिवाजीनगर आणि परिसरात गेल्या चार महिन्यांपासून कोलमडलेले पाण्याचे वेळापत्रक अजूनही पूर्ववत झाले नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या आठवडाभरापासून या भागांतील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. कमी दाबाने येणारे पाणी शनिवारी न आल्याने रहिवाशांचे हाल झाले. दुसरीकडे, तांत्रिक कारणांमुळे लोकांना अपुरे पाणी मिळत असल्याचा नेहमीचा खुलासा महापालिका करीत आहे. याबाबत नगरसेवक पाणीपुरवठा खात्याला कळविल्याचे उत्तर देत आहेत. त्यामुळे तक्रारी तरी कोणाकडे करायची? अशी चिंता रहिवाशांना आहे.

शहराच्या काही भागांतील पाणीपुरवठा विस्कळित होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यात शिवाजीनगर परिसरातील सोसायट्या, वसाहती आणि बैठी घरे असलेल्या भागांत अपुरे आणि फारच कमी दाबाने पाणी येत असल्याची स्थिती आहे. त्यावर पाहणी करून पुरेसे पाणी देण्याचे आश्‍वासन नगरसेवक, अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानंतर किमान पाणी मिळत नसल्याने रहिवाशांनी आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. त्यापलीकडे जाऊन या भागातील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी गेल्या आठवड्यात महापालिका आयुक्त सौरभ राव यांना जाब विचारत पाणी देण्याची मागणी केली.

पोलिस वसाहतीपाठोपाठ सेनापती बापट रस्ता, प्रभात रस्ता, आपटे रस्ता, हनुमाननगरचा काही भाग, शिवाजीनगर गावठाणात काही ठिकाणी वेळापत्रकानुदार पाणी येत नाही, असे रहिवाशांनी सांगितले. तर, सेनापती बापट रस्त्यावरील काही रहिवाशांना चार-पाच दिवसांपासून अर्धा तासही पाणी मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

याबाबत महापालिका आयुक्त सौरभ राव म्हणाले, ‘‘शहराच्या सर्व भागांतील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची सूचना केली आहे. पुढील चार दिवसांत अडथळे दूर करून पाणीपुरवठा केला जाईल.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water issue shivajinagar aera in pune