
पुणे शहराला खडकवासला पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणातून १९ टीएमसी, पवना धरणातून ०.३४ टीएमसी आणि भामा आसखेड धरणातून २.६२ टीएमसी पाणी पुरवठा वर्षाला होतो.
खडकवासल्यातील पाणी बिघडले; जीवाणूंमध्ये दीडशेपट वाढ
पुणे - खडकवासला धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात वाढणारे बांधकाम आणि लोकसंख्येमुळे आरोग्यास अपायकारक असलेले ‘कॉलीफॉर्म’, ‘ई कोलाय’ सारख्या जीवाणूंचे प्रमाण गेल्या १५ वर्षात तब्बल दीडशे पट वाढ झाल्याने पुण्याचे पाणी बिघडत असल्याचे महापालिकेच्या प्रयोगशाळेतील तपासणीवरून स्पष्ट झाले आहे. मात्र, महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाण्यावर योग्य पद्धतीने प्रक्रिया केली जात असून, पुणेकरांना एकदम शुद्ध व घातक जीवणूरहीत पाणी पुरवठा केला जात आहे, देशात सर्वाधिक शुद्ध पाणी पुरवठा करणारी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेचा गौरव केला जातो, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुणे शहराला खडकवासला पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणातून १९ टीएमसी, पवना धरणातून ०.३४ टीएमसी आणि भामा आसखेड धरणातून २.६२ टीएमसी पाणी पुरवठा वर्षाला होतो. यामध्ये प्रमुख्याने खडकवासला धरणातून जलवाहिनीद्वारे पर्वती जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी येते.
गेल्या काही वर्षात निसर्गरम्य अशा खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांमध्येही मोठ्या सोसायट्या, बंगले, कारखाने उभे राहिले आहेत. या भागातील लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे या गावांमध्ये निर्माण होणारे मैलापाणी थेट खडकवासला धरणात येत आहे. यापूर्वी अनेक पर्यावरणाशी संबंधित काम करणाऱ्या संस्था, व्यक्तींनी याबद्दल चिंता व्यक्त केलेली आहेच.
२००६-०७ च्या सुमारास खडकवासला धरणातून पर्वती जलकेंद्रात येणाऱ्या व प्रक्रिया न केलेल्या पाण्यात कॉलीफॉर्म आणि ई कोलाय या जीवाणूंचे प्रमाण प्रति १०० मिलिलिटर मधील प्रमाण ८०० ते ९०० इतके होते. परंतु दरवर्षी यात वाढ होऊन आता सुमारे १ लाख ६० हजारपर्यंत हे प्रमाण गेले आहे.
पुणेकरांना शुद्ध पाणी
महापालिकेच्या प्रयोग शाळेत पाण्याची तपासणी करून त्यामध्ये क्लोरिन टाकून पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया केला जाते. ही प्रक्रिया करताना जागतिक आरोग्य संघटनेने निश्चीत केलेल्या मानांकनानुसार पुणेकरांना पाणी दिले जाते. खडकवासला धरणातून किती जिवाणू आले तरी त्यांना रोखण्याची आणि नष्ट करण्याची अत्याधुनिक यंत्रणा महापालिकेकडे आहे. त्यामुळे पुणेकरांना भितीचे कारण नाही. सर्वाधिक शुद्ध पाणी देणारी महापालिका म्हणून देशात पुण्याचा लौकिक आहे, असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.
‘२००६-०७ ला धरणातून येणाऱ्या पाण्यात कॉलीफॉर्म आणि ई कोलाय जीवाणूंचे प्रमाण प्रति १०० मिलिलिटर ८०० ते ९०० इतके होते. पण आता हे प्रमाण प्रति १०० मिलिलिटर १ लाख ६० हजार पर्यंत गेले आहे. या जिवाणूंमुळे साथीचे रोग पसरण्याचा धोका अधिक असतो. पण महापालिका १०० टक्के पाणी शुद्ध करते, त्यामुळे कोणताही त्रास नागरिकांना होत नाही.’
- मंदार सरदेशपांडे, वरिष्ठ रसायनशास्त्रतज्ज्ञ, महापालिका प्रयोगशाळा.
धोरणात्मक निर्णय आवश्यक
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्याप्रमाणात निवासी इमारती, बंगले वाढल्याने मानवी वस्ती वाढत आहे. याठिकाणी निर्माण होणाऱ्या मैलापाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याने हे पाणी थेट नाले, ओढ्यांमधून धरणाच्या पाण्यात मिश्रित होत आहे. हा धोका लक्षात घेऊन शासनाने आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग यासह इतर विभागात समन्वय वाढवून त्यावर प्रतिबंध केला पाहिजे. हे पाणी थेट धरणात येणार नाही, त्यावर प्रक्रिया केली जाईल यासाठी यंत्रणा उभारावी तरच धरणाचे प्रदूषण थांबेल.’
- सचिन पुणेकर, पर्यावरण तज्ज्ञ