

जलवाहिन्यांच्या गळतीबाबतच्या तक्रारींची ढीग
ठेकेदारांच्या मनमानी कारभार; दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याची मागणी
सातारा, ता. २६ : शहरातील विविध भागांतून खंडित पाणीपुरवठ्याबाबत, तसेच जलवाहिन्यांच्या गळतीबाबतच्या तक्रारींची ढीग वाढू लागला आहे. एकीकडे नळांना पाणी येत नाही, तर दुसरीकडे रस्त्यावरील पाण्याची गळती होत असल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. नागरिकांकडून सातत्याने तक्रारी नोंदवूनही पाणीपुरवठ्यासाठी असलेल्या ठेकेदारांकडून वेळेत काम होत नसल्याने पालिका प्रशासनासह नगरसेवक, नगरसेविकांना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. ठेकेदारांच्या मनमानी कारभारावर पालिका वचक निर्माण करणार का? आणि नागरिकांची पाण्याची ही हेळसांड कधी थांबणार? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
पालिकेकडून पाणीपुरवठा सुरळीत आहे. शहरातील विविध प्रभागांमधून दररोज सुमारे चार ते पाच तक्रारी पाणीपुरवठा विभागात येत असतात. पाणी कमी दाबाने येणे, नळांना गळती असणे, पाणी न येणे आदींचा समावेश आहे. या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी, तसेच दुरुस्तीची कामे करण्यासाठी ठेकेदारांना कामाचे वाटप करण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगळेच दिसून येत आहे. नागरिकांनी तक्रार नोंदवल्यानंतरही दुरुस्तीचे काम होण्यासाठी तब्बल १० ते १२ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी, नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो, पिण्याच्या पाण्यासह वापराच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागताहेत. केवळ तक्रारी नोंदवून न घेता, त्या तक्रारींचा प्रत्यक्ष निपटारा झाला किंवा नाही, याची खात्रीशीर आणि पारदर्शक नोंद ठेवण्याची यंत्रणा उभी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.
चौकट
बैठकीतील सूचना केवळ कागदावरच
पालिका पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली होती. त्यात ठेकेदारांना त्यांची माणसं वाढवून दुरुस्तीची कामे तातडीने मार्गी लावण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, या सर्व सूचना केवळ कागदावरच राहिल्या असून, ठेकेदारांच्या कारभारात कोणताही बदल झाला नसल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे आचारसंहितेमुळे दहा नवीन ठेकेदार घेण्याची कार्यवाही बारगळल्याची चर्चा आहे.
------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.