खडकवासला धरणातून 9 हजार क्युसेकने विसर्ग; नदीकाठच्या गावांना इशारा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 August 2020

खडकवासला धरण साखळीतील पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे मागील 24 तासांत शुक्रवारपर्यंत पाणीसाठ्यात दीड अब्ज घनफूट (टीएमसी) ने वाढ झाली.

पुणे, ता. 14 : खडकवासला धरण साखळीतील पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे मागील 24 तासांत शुक्रवारपर्यंत पाणीसाठ्यात दीड अब्ज घनफूट (टीएमसी) ने वाढ झाली. शुक्रवारी सायंकाळी टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांतील पाणीसाठा 21.55 टीएमसी (73.92 टक्के) इतका झाला आहे. 

खडकवासला धरणातून गुरुवारी सायंकाळी मुठा नदीतून 11 हजार 705 क्युसेकने विसर्ग वाढविण्यात आला होता. तो आज सकाळी पाच हजार 136 क्युसेक करण्यात आला. त्यानंतर पुन्हा रात्री नऊ वाजल्यापासून 9 हजार क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

वीर धरणातून 32 हजार 214 क्युसेकने नीरा नदीत विसर्ग करण्यात येत होता. तो सकाळी कमी करून 23 हजार 127 क्युसेक करण्यात आला आहे. खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी रात्री दमदार पाऊस झाला. शुक्रवारी दिवसभरात टेमघर परिसरात 43 मिलिमीटर, वरसगाव 14, पानशेत धरणाच्या क्षेत्रात 16 मिलिमीटर आणि खडकवासला धरण क्षेत्रात सकाळपर्यंत 4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. खडकवासला प्रकल्पात गतवर्षी 14 ऑगस्टअखेर 29.15 टीएमसी (100 टक्के) पाणीसाठा होता. 

हे वाचा - खेड, शिरूरची चिंता मिटली, चासकमान धरणात एवढा साठा

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा (टीएमसीमध्ये) कंसात टक्केवारी :

 • टेमघर 2.01   (54.06)
 • वरसगाव 8.79   (68.58)
 • पानशेत 8.78  (82.42)
 • खडकवासला 1.97  (100)

कोयना धरणातील पाणीसाठा कालच्या तुलनेत शुक्रवारी चार टीएमसीने वाढला असून, 77.26 टीएमसीवर (77.17 टक्के) झाला आहे.‌ तर, उजनी धरणातील पाणीसाठ्यात एका टीएमसीने वाढून तो 17.30 टीएमसीपर्यंत (32.29 टक्के)
पोचला आहे.

इतर प्रमुख धरणांतील पाणीसाठा : 

 • भामा आसखेड 4.71     (61.42)
 • पवना 5.01  (58.84)
 • डिंभे 7.16    (57.31)
 • मुळशी 14.43    (78.15)
 • नीरा देवधर 7.75    (66.07)
 • भाटघर 18.54   (78.91)
 • वीर  9.31    (99.93)   
 • वारणावती 23.24   (84.45)
 • दूधगंगा 21.37    (89.13)
 • राधानगरी 7.30     (98.87)

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा : 
खडकवासला, वीर आणि गुंजवणी धरणातून नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रात कोणी जाऊ नये. तसेच वाहने पार्किंग करू नयेत असा सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभाग आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water release from khadakwasala dam alert to villages