esakal | चास-कमान धरणातून पुन्हा विसर्ग सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

चास-कमान धरणातून पुन्हा विसर्ग सुरू

चास-कमान धरणातून पुन्हा विसर्ग सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चास : चास- कमान धरणाच्या (ता. खेड) पाणलोट क्षेत्रातील भिमाशंकर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे धरणाचे पाचही दरवाजे दहा सेंटिमीटरने उघडून १८५० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रात सुरू आहे.

चालू वर्षी ऑगस्ट महिन्याच्या चार तारखेला सर्वप्रथम धरणाचे दरवाजे उघडण्यात येऊन भीमा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर ६ ऑगष्ट रोजी पाऊस थांबल्याने धरणाचे उघडण्यात आलेले दरवाजे बंद करून फक्त कालव्याव्दारे ५७० क्युसेक्स व कालव्यातून अतीवाहकाव्दारे नदीपात्रात २८० क्युसेक्सने विसर्ग सुरू ठेवण्यात आला होता. गेल्या दोन दिवसांपासून चास कमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व प्रामुख्याने श्री क्षेत्र भिमाशंकर परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा वेगाने वाढण्यास सुरूवात झाली आहे.

चास कमान धरणात शंभर टक्के पाणीसाठा असल्याने अतिरिक्त ठरणारे पाणी सोडणे गरजेचे असल्याने प्रथम शनिवारी सकाळी सात वाजता धरणाचे पाचही दरवाजे पाच सेंमी उघडून भीमा नदीपात्रात ९२५ क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला, मात्र दुपारी धरणात पाण्याची आवक वाढल्याने दहा सेंमी ने दरवाजे उघडून १८५० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे वतीने शाखा अभियंता महेंद्र गायकवाड तसेच सहाय्यक अभियंता प्रेमचंद शिंदे यांनी दिली.

नदीकाठी सतर्कतेचा इशारा

धरणातून सद्यः स्थितीत दरवाजाव्दारे १८५०, कालव्याव्दारे ५७० तर कालव्यातून अतीवाहकाव्दारे नदीपात्रात २८० असा एकूण २७०० क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. भिमाशंकर खोऱ्यात पाऊस सुरूच असल्याने गरजेनुसार विसर्गात वाढ करावा लागणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

loading image
go to top