पाणीटंचाईच्या उपाययोजनांना गती द्या; १६ खेडी योजना तातडीने सुरू करण्याचे निर्देश

पाणीटंचाईच्या उपाययोजनांना गती द्या; १६ खेडी योजना तातडीने सुरू करण्याचे निर्देश
Published on: 
पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांना गती द्या आमदार प्रवीण स्वामी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश; टँकर, विहीर अधिग्रहण, चारा छावण्यांचा आढावा लोहारा, ता. ४ (बातमीदार) : दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रवीण स्वामी यांनी बुधवारी (ता. ४) पंचायत समिती सभागृहात तातडीची आढावा बैठक घेतली. प्रलंबित पाणीपुरवठा योजना, टँकरचे प्रस्ताव, विहीर अधिग्रहण, चारा छावण्या आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न यावेळी ऐरणीवर आला. केवळ कागदोपत्री नियोजन न करता प्रत्यक्ष उपाययोजनांना गती देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तालुक्यातील १६ खेडी पाणीपुरवठा योजनेच्या सद्यःस्थितीवर बैठकीत विशेष चर्चा झाली. योजनेच्या वीज जोडणीचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. उर्वरित तांत्रिक कामे तातडीने पूर्ण करून योजना लवकरात लवकर कार्यान्वित करावी, अशी सूचना आमदार स्वामी यांनी केली. टंचाईग्रस्त गावांमधील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन टँकरचे प्रस्ताव प्रलंबित न ठेवता तातडीने मंजूर करावेत. आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे अधिग्रहण करावे, असेही त्यांनी सांगितले. दुष्काळामुळे पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असल्याने चारा छावण्यांचे नियोजन आणि प्रशासकीय तयारी आतापासूनच ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्नही चर्चेला आला. बँकांकडून अनावश्यक कागदपत्रांची मागणी किंवा तांत्रिक कारणांमुळे पात्र शेतकऱ्यांची प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत, असे आमदार स्वामी यांनी स्पष्ट केले. बैठकीस उपविभागीय अधिकारी संतोष ननवरे, तहसीलदार रणजितसिंह कोळेकर, सभापती पल्लवी जानकर, उपसभापती अमोल पाटील, ॲड. दीपक जवळगे, सलीम शेख, पंडित ढोणे आदी उपस्थित होते. ......................... PDA26A05620 परंडा : डी. जे. गणगे यांचा सेवापूर्तीनिमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. डी. जे. गणगे यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार परंडा : तालुक्यातील रत्नापूर येथील श्रीमती पवित्राताई दैठणकर हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. जे. गणगे यांचा सेवापूर्तीनिमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. शनिवारी (ता. ३१) रत्नापूर येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत गणगे दाम्पत्याचा गौरव करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात ३४ वर्षे सेवा बजावल्यानंतर सेवापूर्तीचा हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती रणजितसिंह पाटील, युवराजसिंह पाटील, आनंदराव देशमुख, अशोकराव काळे-पाटील, लक्ष्मणराव खारतुडे, श्रीराम देवकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामलिंग भोगील, डी. आर. भोगील, डॉ. राहुल अंधारे, वसिष्ठ जतकर, दीपक शेंडगे, हरिश्चंद्र मिस्कीन, किरण शिंदे, प्राचार्य एस. बी. पवार, उद्योजक अशोक गणगे, गोकूळ गणगे, सोमनाथ देवकर, बिरमल तरंगे, हनुमंत मोटे आदी उपस्थित होते. याशिवाय मुख्याध्यापक एन. एन. साबळे, अशोक सावंत, माजी मुख्याध्यापक व्ही. जी. देवकर, डॉ. रामचंद्र खताळ यांचीही उपस्थिती होती. सूत्रसंचालन उद्धव लांडे यांनी केले, तर प्रास्ताविक श्रावण कांबळे यांनी केले. ............. फोटो ओळ ANU26A01225 अणदूर : राज्यस्तरीय व विभागीय स्पर्धांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना जिल्हा परिषद सदस्य डॉ. जितेंद्र कानडे, डॉ. नागनाथ कुंभार व इतर. श्री श्री गुरुकुलच्या गुणवंतांचा सत्कार अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री श्री गुरुकुल शाळेतील राज्यस्तरीय व विभागीय स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बुधवारी (ता. ४) सत्कार करण्यात आला. विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य डॉ. जितेंद्र कानडे होते. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. नागनाथ कुंभार, शिवसेना नेते बाळकृष्ण घोडके-पाटील, ग्रामपंचायत सदस्य बालाजी घुगे, डॉ. हरिदास मुंडे, संचालिका डॉ. रूपाली कानडे, मुख्याध्यापक लक्ष्मण नरे आणि मुख्याध्यापक शिवराज भुजबळ यांची उपस्थिती होती. राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत यश मिळविणारे अर्णव कानडे आणि आर्यन शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विभागीय स्पर्धांमध्ये यशस्वी झालेले श्रेयश गावित, ध्रुवराज मुळे, श्रेयश मुळे आणि अर्णव मुळे यांचाही गौरव करण्यात आला. महा टॅलेंट परीक्षेत यश संपादन करणारे तांबोळी, विश्वराज भुजबळ, विराज घोडके, लक्ष्मीकांत गवळी आणि आयुष श्रीकांत या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक रामेश्वर सावंत यांनी केली. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर बंडगर यांनी केले, तर आभार अर्जुन माशाळकर यांनी मानले. .............................. दुष्काळग्रस्त शेतकरी, गरजूंना दिवाळी फराळ वाटप विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा ‘एक दीप मदतीचा’ उपक्रम धाराशिव, ता. ४ (बातमीदार) : दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी, शेतमजूर आणि गरजू कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या उद्देशाने धाराशिव तालुक्यातील खेड येथे ‘एक दीप मदतीचा’ हा उपक्रम राबविण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मंगळवारी (ता. ३) गरजू कुटुंबांना दिवाळी फराळाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. खेडचे सरपंच सुनील गरड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास उपसरपंच गणेश गवाड, विद्यापीठ उपकेंद्राचे संचालक प्रा. डॉ. रमेश चौगुले, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. गोविंद कोकणे, डॉ. मेघश्याम पाटील, डॉ. विक्रम शिंदे आणि डॉ. राधाकृष्ण तिगोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आणि शेतमजूर अडचणीत सापडले आहेत. अशा प्रसंगी गरजू घटकांच्या पाठीशी उभे राहणे हे राष्ट्रीय सेवा योजनेचे आद्यकर्तव्य आहे. सामाजिक बांधिलकीचा विचार डोळ्यांसमोर ठेवून हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यापीठातील प्राध्यापक, एकत्रित वेतनावरील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गावातील भूमिहीन, शेतमजूर, दिव्यांग आणि निराधार कुटुंबांना दिवाळी शिधा साहित्याचे वाटप करण्यात आले. या साहित्यामध्ये साखर, गूळ, सूर्यफूल तेल, तांदूळ, साबण, हरभरा डाळ, रवा, बेसन, मैदा आणि चिवडा मसाला आदी वस्तूंचा समावेश होता. एकूण ४० किटचे वाटप करण्यात आले. गरजूंना दिवाळी आनंदात साजरी करता यावी, हा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. डॉ. गोविंद कोकणे यांनी प्रास्ताविक केले. तर डॉ. मेघश्याम पाटील यांनी आभार मानले. ................... ‘वीटभट्टी, ऊसतोड मजुरांचे सर्वेक्षण करा’ कळंब शहर, ता. ४ (बातमीदार) : परंडा तालुक्यात उघडकीस आलेल्या वेठबिगारीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कळंब तालुक्यातील वीटभट्ट्या, ऊसतोड टोळ्या आणि शेतातील सालगडी मजुरांचे संयुक्त सर्वेक्षण करावे, अशी मागणी लहुजी शक्ती सेनेने केली आहे. प्रदेश महासचिव बालाजी भाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार हेमंत ढोकले यांना याबाबत निवेदन देण्यात आले. कळंब तालुक्यात वेठबिगारीच्या घटना घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २३ नुसार वेठबिगारी हा दंडनीय अपराध असून, वेठबिगार पद्धत निर्मूलन अधिनियम १९७६ नुसार ही पद्धत पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. मात्र, कळंब तालुक्यातील वीटभट्ट्या, ऊसतोडीचे फड आणि मोठ्या शेतातील सालगडी मजुरांची अधिकृत नोंदणी व सर्वेक्षण प्रशासनाने केलेले नाही. त्यामुळे शेकडो मजूर किमान वेतनापासून वंचित असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तालुक्यातील सर्व वीटभट्ट्या आणि ऊसतोड टोळ्यांचे तातडीने संयुक्त सर्वेक्षण करावे, अधिनियमाच्या कलम १३ नुसार उपविभागीय दक्षता समितीची बैठक घेऊन कलम १४ नुसार मुक्तता व पुनर्वसनाचा आराखडा तयार करावा, बैठकीचे इतिवृत्त संघटनेला लेखी स्वरूपात द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. आंतरराज्य स्थलांतरित कामगार अधिनियम १९७९ आणि किमान वेतन कायद्यानुसार मजुरांची नोंदणी करावी. अन्याय-अत्याचार आढळल्यास संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास कळंब तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. निवेदनावर बालाजी गायकवाड, हनुमंत पाटुळे, संतोष कसबे, विठ्ठल ताटे, मंगल पवार, संजय कांबळे, विनोद चव्हाण, सुनील ताटे, श्रीमंत माळी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. ................................. KLL26B11034 कळंब ः तालुक्यातील दाभा येथे दुष्काळग्रस्त नागरिकांना दिवाळी शिधा वाटप करताना मान्यवर. मदतीचा हात देत दिवाळीचा गोडवा आमदार जगताप यांच्या वतीने दाभा येथे धान्य किटचे वाटप कळंब, ता. ४ (बातमीदार) : दुष्काळाच्या झळांनी होरपळणाऱ्या शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबांच्या दिवाळीत आनंदाची गोडी निर्माण करण्यासाठी चिंचवडचे आमदार शंकरभाऊ जगताप यांनी सामाजिक बांधिलकी जपत कळंब तालुक्यातील दाभा गावातील गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला. महिनाभर पुरेल इतके रेशन, धान्याचे किट आणि दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. यंदा पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाड्यातील ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी आणि शेतमजुरांसमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन खर्च भागविण्याचे संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत दिवाळीचा सण साजरा करणेही अनेक कुटुंबांसाठी आर्थिकदृष्ट्या कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार जगताप यांच्या वतीने दाभा येथील गरजू कुटुंबांना महिनाभराचे रेशन, धान्याचे किट आणि दिवाळी फराळ वाटप करण्यात आला. सणासुदीच्या काळात मिळालेली ही मदत केवळ अन्नधान्यापुरती मर्यादित नसून संकटाच्या काळात समाजातील सक्षम घटक आपल्या पाठीशी उभे आहेत, हा विश्वास देणारी आहे. या मदतीमुळे अनेक कुटुंबांची महिनाभराच्या अन्नधान्याची चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे, अशी भावना मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे संस्थापक महेश टेळे यांनी व्यक्त केली. यावेळी दाभ्याचे सरपंच बाबा टेळे, ओमकार इरकर, सुभाष टेळे, प्रकाश टेळे, श्यामराव टेळे, बालासाहेब टेळे, रामराजे टेळे, सुधाकर टेळे, ॲड. प्रदीप टेळे, जगन्नाथ जाधव, सुग्रीव लोमटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रदीप टेळे यांनी केले, तर दत्तात्रय टेळे यांनी आभार मानले. ...... JEW26A02206 जेवळी ः पालकमंत्री प्रताप सरनाईक व मठाधीश म. नि. प्र. गंगाधर महास्वामीजी यांच्या हस्ते दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिवाळी किटचे वाटप करण्यात आले. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित करणार पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची ग्वाही; जेवळी येथे दिवाळी शिधा किटचे वाटप जेवळी, ता. ३ (बातमीदार) : दुष्काळाच्या गंभीर संकटात शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी कुटुंबांच्या घरातील दिवाळीचा आनंद कमी होऊ देणार नाही, अशी ग्वाही धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त आणि गरीब शेतकरी कुटुंबांना दिवाळीचा सण आनंदात साजरा करता यावा, या सामाजिक बांधिलकीतून शिवसेनेचे मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मदतीचे तोरण हेच शिवसेनेचे धोरण’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सोमवारी (ता. २) जेवळी (ता. लोहारा) येथील गुरू सिद्धेश्वर विरक्त मठात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वनिधीतून दुष्काळग्रस्त व गरजू शेतकरी कुटुंबांना दिवाळी शिधा अर्थात किराणा किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मठाधीश म. नि. प्र. गंगाधर महास्वामीजी होते. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. संकटाच्या काळात समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे पालकमंत्री सरनाईक यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हा परिषद उपाध्यक्षा उषा गायकवाड, उमरगाचे नगराध्यक्ष किरण गायकवाड, उमरगा पंचायत समितीच्या सभापती आकांक्षा चौगुले, लोहारा पंचायत समितीच्या सभापती पल्लवी जानकर, माजी जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, लोहारा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा वैशाली खराडे, जिल्हा परिषद सदस्या श्रुती पणुरे, आनंद पाटील, ॲड. स्वप्निल कारभारी, जगन्नाथ पाटील, अमोल बिराजदार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.