
सह्याद्रीच्या पठारावरील नाणे पठार, करंजगाव पठार, डोंगरवाडी, धनगरवाडी, सटवाईवाडी, उकसान-पाले पठार, कुसूर पठार, कांब्रे पठार या ठिकाणी राहणाऱ्या आदिवासी व धनगर बांधवांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ वणवण
टाकवे बुद्रूक - सह्याद्रीच्या पठारावरील नाणे पठार, करंजगाव पठार, डोंगरवाडी, धनगरवाडी, सटवाईवाडी, उकसान-पाले पठार, कुसूर पठार, कांब्रे पठार या ठिकाणी राहणाऱ्या आदिवासी व धनगर बांधवांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. मावळ तालुक्यातील नाणे मावळ भाग हा आंदर मावळ भागाच्या सीमावर्ती आहे. स्वातंत्र्यकाळ उलटूनही कित्येक वर्षे झालीत असून मात्र, येथील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी जिवाची कसरत करावी आहे.
येथील पठारावर नैसर्गिक स्रोत आहेत. मात्र, उन्हाच्या तडाख्याने ते आटले आहेत. थोड्या प्रमाणात शिल्लक असलेले पाणी भरण्यासाठी येथील नागरिकांना ताटकळत थांबावे लागत आहेत. तसेच पाणी वाहण्यासाठी येथील नागरिकांना व महिलांना कामधंदे सोडून तासनतास वाया घालवावा लागत आहे.
हंडाभर पाण्यासाठी येथील नागरिकांना जिवाशी तडजोड करावी लागत आहे. येथे असलेल्या विहिरीच्या पाण्याची पातळी खालावल्याने त्यामध्ये फक्त गाळ उरला आहे. त्यातून उरेल तेवढे पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे. विहिरीतील पाणी चार ते पाच लोकांच्या मदतीने बाहेर काढले जाते. गेल्या सात ते आठ वर्षांपासून विहिरीतील गाळ काढला नसल्यामुळे तेथील पाणी दूषित व बेचव झाले आहे. त्यामुळे आजाराचे प्रमाण वाढत आहे. पाणी काढण्यासाठी कसलीही यंत्रणा नसल्याने नागरिकांना पाणी काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. प्रशासनाने, सामाजिक संस्थांनी, लोकप्रतिनिधींनी या आदिवासी व धनगर बांधवांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
उन्हाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यापर्यंत वस्तीवर पिण्याच्या पाण्यासाठी मोठा प्रश्न आहे. जलजीवन मिशन योजने अंतर्गत मावळ तालुक्यात सर्वत्र नळ पाणीपुरवठा योजना आखल्या जात आहेत. ती कामे सुरू करण्यात आली आहे. पण, येथे आम्हा महिलांना डोक्यावर पाणी वाहून दिवसभर झिजावे लागत आहे.
- जाईबाई आखाडे, स्थानिक रहिवासी, उकसान-पाले पठार
दुर्गम भागात उकसान व पाले पठार येथील आखाडे वस्तीत पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. सध्या उन्हाळा असल्यामुळे येथील लोकांच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विहिरीच्या कठड्यावर उभे राहून पाणी काढावे लागत आहे. विहिरीला संरक्षण कठडे व पाणी काढण्याची सोय नसल्यामुळे विहिरीत पडून मृत्यू झाल्याच्या घडल्या आहेत. वस्तीवरील ४० ते ५० जनावरांना पाणी काढणे एक-दोन माणसांना शक्य होत नाही. या दूषित पाण्याची व विहिरींच्या पाणी काढण्याचे उपाययोजना बाबत ग्रामपंचायत व प्रशासनाला तक्रार करून यावर लक्ष दिले जात नाही.’’
- मंगेश आखाडे, स्थानिक रहिवासी, उकसान-पाले पठार
Web Title: Water Shortage In Pune District Villages
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..