लाडेवाडी व कापूसवाडीला नव्या योजनेचे पाणी द्यावे नागरिकांचा आंदोलनाचा पवित्रा, सरपंच आणि ग्रामसेवकांना दिले मागण्यांचे निवेदन

लाडेवाडी व कापूसवाडीला नव्या योजनेचे पाणी द्यावे नागरिकांचा आंदोलनाचा पवित्रा, सरपंच आणि ग्रामसेवकांना दिले मागण्यांचे निवेदन

Published on

लाडेवाडी, कापूसवाडीला नवीन योजनेचे पाणी द्या

ग्रामस्थांची मागणी; विरळीचे सरपंच, ग्रामसेवकांना निवेदन, आंदोलनाचा इशारा

म्हसवड, ता. ३ : विरळी (ता. माण) येथील ग्रामपंचायतीच्या पूर्णत्वास आलेल्या नवीन पाणी योजनेचे नळ कनेक्शन विरळीप्रमाणे ग्रामपंचायत हद्दीतील लाडेवाडी आणि कापूसवाडी येथील ग्रामस्थांनाही मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन सरपंच आणि ग्रामसेवकांना दिले आहे. यासाठी ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
लाडेवाडी आणि कापूसवाडी भागात लोकवस्ती मोठी असून, पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. भीषण टंचाईमुळे येथील महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव धोक्यात घालून विहिरीत उतरून पाणी काढावे लागत आहे. यामुळे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असून, ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
शासनाच्या जलजीवन मिशनअंतर्गत या भागात पाणीपुरवठ्याची योजना पूर्णत्वास आली आहे. केवळ नळ कनेक्शन जोडण्याचे काम बाकी असल्याने ग्रामस्थांना हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढण्यापूर्वी प्रशासनाने हे काम पूर्ण करून सुरक्षित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माणचे गटविकास अधिकारी यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास ग्रामस्थ पुढच्या काळात काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवेदनावर शरद गोरड, वैभव गोरड, सुरेश गोरड, प्रमोद सदाशिव गोरड आणि सागर पडळकर यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com