पुण्यातील पाणी पुरवठा आज पुन्हा विस्कळित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water supply in Pune closed tomorrow

पाणी पुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे आजही शहरातील नागरिकांना पाणी मिळाले नाही.

पुण्यातील पाणी पुरवठा आज पुन्हा विस्कळित

पुणे - पाणी पुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे आजही शहरातील नागरिकांना पाणी मिळाले नाही. पेठा, पर्वती, पद्मावती यासह इतर भागातील नागरिकांना पाणी पुरवठा न झाल्याने संताप व्यक्त केला. सलग दुसऱ्या दिवशी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

पर्वती जलकेंद्र येथील वीज पुरवठा अचानक खंडित झाला, त्यामुळे संपूर्ण पेठा, शिवदर्शन, शिंदे हायस्कूल, तावरे कॉलनी, अरणेश्‍वर, संत नगर, तावरे चौक, ट्रेजर पार्क, सहकारनगर या भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीत आवश्‍यक पाणी जमा होऊ शकले नाही. त्यामुळे या भागात आज पाणी पुरवठा होऊ शकला नाही. तर काही भागात कमी दाबाने पाणी आल्याने नागरिकांची हैराणी झाली. महापालिकेकडून याबाबत कोणतीही माहिती नागरिकांना देण्यात आली नाही. पण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर पाणी येणार नसल्याचे स्पष्ट झाले. तर आज सकाळी वारजे येथे दीड तास वीज पुरवठा खंडित झाल्याने कोथरूड, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, येरवडा यासह इतर भागात उशिरा पाणी मिळाल्याने नागरिकांची धांदल उडाली.

गुरुवारी वारजे येथे वीज पुरवठा खंडित झाल्याने व ब्रेकर खराब झाल्याने संपूर्ण कोथरूड, वारजे, कर्वेनगर, येरवडा, विश्रांतवाडी, डेक्कन जिमखाना या भागातील दिवसभर पाणी नव्हते. आज पाणी पुरवठा सुरळीत होईल असे सांगण्यात आले, पण दीड तास वीज नसल्याने पाणी पुरवठा विस्कळित झाला.

पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, ‘पर्वती जलकेंद्रातील ब्रेकर खराब झाल्याने पेठांसह इतर भागात पाणी पुरवठा विस्कळित झाला होता. दुपारपर्यंत ब्रेकर दुरुस्त करून पाणी पुरवठा सुरळीत केला आहे.

देखभाल दुरुस्तीच्या दर्जावर प्रश्‍न

गेल्या काही महिन्यात पाणी पुरवठा विभागाने विद्युत विषयक कामासाठी पर्वती जलकेंद्र, वारजे जलकेंद्र एसएनडीटी यासह इतर जलकेंद्राच्या अंतर्गत पाणी पुरवठा बंद केला. त्यासाठी दुरुस्तीचे काम केले जाते. पण वारंवार विद्युत व्यवस्थे बिघाड होत असल्याने पाणी पुरवठा विस्कळित होत आहे. पर्वती येथील टँकर भरणा केंद्राच्या स्विचमध्ये शॉर्ट सर्किट होऊन एका कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्याचे नेमके कारणही अद्याप पुढे आलेले नाही. त्यामुळे या देखभाल दुरुस्तीच्या दर्जावर प्रश्‍न उपस्थित राहत आहे. मात्र, पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व देखभाल दुरुस्तीचे कामे व्यवस्थित होत आहेत असा दावा केला.

टॅग्स :puneWater supplyDisrupted