पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही आणि पूर्वेकडील बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर तालुक्यात मात्र पाऊस पडण्याचे नाव घेत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळेच या चार तालुक्यांसह आंबेगावमध्ये मिळून अजूनही 43 टॅंकर सुरूच आहेत.
बारामती : राज्यात इतरत्र महापुराने दैना उडवली असली व पुणे जिल्ह्यात नीरा व भीमा नदीला महापुराची स्थिती उद्भवली असली तरी, जिल्ह्यात अजूनही 43 टॅंकर सुरू आहेत. बारामतीत तर सरकारी 13 टॅंकरच्या जोडीला बारामती तालुका दूध संघांचे टॅंकरही अजून सुरूच आहेत.
पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही आणि पूर्वेकडील बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर तालुक्यात मात्र पाऊस पडण्याचे नाव घेत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळेच या चार तालुक्यांसह आंबेगावमध्ये मिळून अजूनही 43 टॅंकर सुरूच आहेत.
बारामती तालुक्यात सर्वाधिक 115 वाड्यावस्त्या व 11 गावे ऐन पावसाळ्यात टंचाईच्या झळा झेलतच आहेत. या गावांसाठी 13 टॅंकर सुरू आहेत. मात्र, याव्यतिरिक्त बारामती तालुका दूध संघाचेही टॅंकर सुरू आहेत. त्याखालोखाल इंदापूर तालुक्यात 12 गावे व 58 वाड्यावस्त्यांना मिळून 14 टॅंकर सुरू आहेत. पुरंदर तालुक्यात 7 टॅंकरच्या माध्यमातून 7 गावे व 42 वाड्यांना पाणी सुरू असून, दौंड तालुक्यात 7 गावे व 50 वाड्यांना 9 टॅंकर सुरू आहेत. आंबेगाव तालुक्यात 1 गाव व 2 वाड्यांसाठी 1 टॅंकरच्या खेपा सुरू आहेत.
मागणी असूनही टॅंकर बंद
बारामती तालुक्यातील कुतवळवाडी, बोरकरवाडी, नारोळी, कोळोली येथील नागरिकांनी टॅंकर हवा असताना बंद केला जात असल्याची तक्रार केली. मात्र, गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी नारोळी, कोळोली येथे टॅंकर सुरूच आहेत, फक्त कुतवळवाडी व बोरकरवाडी परिसरात तीन किलोमीटर अंतरामध्ये पाणी असल्याने तेथील टॅंकर बंद केले आहेत. तरीदेखील बारामती तालुका दूध संघाचे टॅंकर या भागात सुरू आहेत.