वळती घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस; 15 तासांपासून उरळी कांचन जलमय, पिकांचे  नुकसान

waterlogged for 15 hours due to Heavy rain at walti  hillside Urli Kanchan
waterlogged for 15 hours due to Heavy rain at walti hillside Urli Kanchan

उरुळी कांचन (पुणे)- वळती (ता.हवेली) हद्दीतील घाटमाथ्यावर रविवारी (ता.१८) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने वळतीसह आसपासच्या परिसरातील शेतीचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. वळती गावाच्या हद्दीतील तीन ते साडेतीन हजार एकराहून अधिक क्षेत्रावरील फळबागा, कांदा, तरकारी अशा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. 

तर दुसरीकडे पावसामुळे वळती गावाच्या हद्दीतील चार छोटे - बंधारे फुटल्याने, पावसाचे पाणी शिंदवने मार्गे उरुळी कांचन शहरात शिरल्याने उरुळी कांचन शहरात रविवारी मध्यरात्रीपर्यंत पाण्याने थैमान घातले होते. वळती परिसरात पाऊस बंद होऊन पंधरा तास झाले तरी उरुळी कांचन शहरातील काही रस्ते वाहतूकीसाठी बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आलेली आहे. 

वळती गावाच्या हद्दीतील घाटमाथ्यावर रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जेजुरी बाजूकडून अचानक ढग फुटी सदृश्य मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस तासभर पडला. वळती गावाच्या हद्दीतील हजारो एकरात पाणीच-पाणी झाल्याचे दिसून आले. त्यातच डोंगरातून येणारे पाण्याचे लोट वळती गावाच्या परिसरातील चार छोट्या तलावात शिरल्याने, पाण्याच्या रेट्यामुळे चारही तलावाचे भराव वाहून गेले. यामुळे वळती परिसरात एकच हाहाकार उडाला.

दरम्यान डोंगरातून येणारे पाणी वळती गावाजवळील तलावात जमा होऊ लागल्याने, तो फुटतो की काय अशी अवस्था निर्माण झाली होती. मात्र, शिवसेनेचे संजय उर्फ काका कुंजीर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जेसीबीच्या साह्याने पाणी जाण्यासाठी तलावाच्या एका बाजूने चर काढून दिल्याने वळतीवरील संकट टळले. 

तीन हजार एकराहुन अधिक क्षेत्रावरील पिके वाहुन गेली, कोट्यावधींचे नुकसान...

ढगफुटी सदृश्य पावसामुळे वळती व परिसरातील तीन हजार एकरांहून अधिक शेतीमधील पिके पाण्यामळे वाहुन गेली आहेत. तर फलबागाचेही अतोनात नुकसान झाले आहे. तरकारी, कांदा यासारखी नगदी पिके पुर्णपणे वाहुन गेली आहेत तर, वळती परिसरातील पावसाचे पाणी शिंदवने परिसरात शिरल्याने, शिंदवने व उरुळी कांचन परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. 

उरुळी कांचन जलमय, ओढ्यावरील अतिक्रमणाचा फटका... 
वळती परिसरात झालेल्या पावसाचे पाणी शिंदवने मार्गे उरळीकांचन शहरास रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन शहरात शिरले. उरुळी कांचन शहरातून वाहणाऱ्या ओढ्याच्या दोन्ही बाजुला अतिक्रमण झाल्याचा फटका उरुळी कांचन शहरवाशियांनी चांगलाच अनुभवला. ओढ्यावर झालेल्या अतिक्रमामुळे ओढ्यातून पाणी जाण्यास पुरेशी जागा नसल्याने, ओढ्यातील पाणी शहरात शिरले. यामुळे ओढ्याकाठच्या हजारो नागरीकांना रात्र जागून काढावी लागली. हवेलीचे तहसिलदार सुनिल कोळी, लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर, सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळीच ग्रामस्थांची काळजी घेतल्याने, उरुळी कांचन परीसरात कोणत्याही प्रकारची जिवीत अथवा वित्तहाणी होऊ शकली नाही. 

पंधरा तासानंतरही उरुळी कांचनमध्ये पाणीच पाणी... 
ढगफुटी सदृश्य पाउस होऊन पंधरा तासाचा कालावधी उलटला असला तरी, अद्याप वळती येथुन पाणी मोठ्या प्रमानात उरुळी कांचन येथे येत असल्याने उरुळी कांचन शहरात प्रमुख रस्त्यावर पाणीच पाणी दिसुन येत आहे. ओढ्यातून जाणारे पाणी रेल्वेखालील नऊ मोऱ्यात बसत नसल्याने, पाण्याचा फुगारा गावात दिसून येत आहे. परिणामी गावातील अनेक रस्ते बंद ठेवण्यात आलेले आहेत. पुढील घडामोडींवर लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर व त्यांचे सहकारी लक्ष ठेवून आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com