युद्धाचे कारण सांगत स्थानिक मालाच्या खरेदीवर परिणाम व्यापारी लढवली शक्कल
MGV26B15497
जालिहाळ (ता. मंगळवेढा) : येथील दुष्काळी पट्ट्यातील उजाड माळरानावर फुललेले कलिंगडचे पीक.
---
मंगळवेढ्यातील कलिंगडाला बसतोय युद्धाचा फटका
कमी दरात खरेदीचा व्यापाऱ्यांकडून प्रयत्न; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. ५ (सकाळ वृत्तसेवा) : सध्या इराण विरुद्ध अमेरिका व इस्राईल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे कारण पुढे करत मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून कलिंगडाची कमी दरात खरेदी करण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांकडून होत आहे. याबाबतच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे दुष्काळी भागात कष्टाने कलिंगड पिकवणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंगळवेढा तालुका रब्बी हंगामात ज्वारीसाठी राज्यभर प्रसिद्ध आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत परिसरात साखर कारखान्यांची संख्या वाढल्याने ऊस लागवडीचे क्षेत्रही वाढले आहे. तसेच कोरोना काळात रोजगाराच्या संधी कमी झाल्यामुळे बाहेरगावी गेलेले अनेक तरुण गावी परतले आणि त्यांनी पशुधन व शेतीच्या माध्यमातून रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. पशुधनासाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी मका पिकाची लागवडही वाढली. बदलत्या परिस्थितीत शेतकरी विविध पिकांचा स्वीकार करत असून, उन्हाळा व रमजान महिन्यात वाढणारी मागणी लक्षात घेऊन जानेवारी महिन्यात तालुक्यातील सधन पट्टा आणि दुष्काळी भागातही कलिंगड लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली.
साधारणपणे मार्चअखेर किंवा एप्रिलमध्ये विहिरीतील पाण्याची पातळी कमी होण्यापूर्वीच हे पीक बाजारात येते आणि शेतकऱ्यांना काही प्रमाणात उत्पन्न मिळते. यंदाही उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने तसेच रमजान महिन्यामुळे कलिंगडाला मागणी वाढण्याची अपेक्षा होती. मात्र, स्थानिक बाजारात माल विक्रीसाठी आणल्यानंतर काही व्यापाऱ्यांनी पश्चिम आशियातील युद्धाचे कारण देत बाहेरील व्यापारी माल खरेदीसाठी येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे कमी दरात कलिंगड खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे शेतकरी सांगत आहेत. पीक उत्पादनासाठी वाढलेला खर्च, खत- औषधांच्या फवारण्या आणि सिंचनाची अडचण यामुळे शेतकरी आधीच अडचणीत असताना, कमी दरात माल विकण्याची वेळ येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
---
कोट
MGV26B15496
दुष्काळी भागात कमी पाण्यावर उन्हाळ्यात काही पैसे मिळावेत म्हणून अर्धा एकर कलिंगडाची लागवड केली. त्यासाठी सुमारे ६० हजार रुपये खर्च झाला आहे. सध्या २०-२१ रुपये दर अपेक्षित असताना व्यापारी युद्धाचे कारण देत १३ रुपये दर मागत आहेत.
- भारत जोग, शेतकरी, जालिहाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

