Video : पुंडलिका वरदे हरी विठ्ठलच्या गजरात तुकोबांच्या पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ

मुकुंद परंडवाल
मंगळवार, 30 जून 2020

टाळ मृदंगाच्या गजरात, ज्ञानोबा, तुकाराम आणि पुंडलिका वरदे हरी विठ्ठलाच्या नामघोषात आषाढी एकादशीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहूतून पंढरपूरकडे मंगळवारी (ता. 30) दुपारी 1 वाजता मार्गस्थ झाल्या.

Wari 2020 देहू : टाळ मृदंगाच्या गजरात, ज्ञानोबा, तुकाराम आणि पुंडलिका वरदे हरी विठ्ठलाच्या नामघोषात आषाढी एकादशीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहूतून पंढरपूरकडे मंगळवारी (ता. 30) दुपारी 1 वाजता मार्गस्थ झाल्या. फुलांनी सजविलेल्या एसटी बसमध्ये यंदा तुकोबांच्या पादुका संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त आणि सेवेकरी अशा वीस जणांबरोबर पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. देहूकरांनी रस्त्याच्याकडेला उभे राहून या सोहळ्याला भावपूर्ण निरोप दिला. एसटी बसच्या मागे पुढे चोख पोलिस बंदोबस्त होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने पालखी सोहळ्यातील पायी वारी रद्द केली. त्यामुळे 12 जूनला प्रस्थान झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पादुका देऊळवाड्यातच मुक्कामी होत्या. पालखी सोहळ्यातील परंपरेनुसार होणारी नित्यपूजा, आरती, किर्तन आणि जागर गेले 19 दिवस देऊळवाड्यातच संस्थानने घेतले. बुधवारी 1 जुलैला आषाढी एकादशी आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शासनाने केवळ वीस जणांच्या उपस्थितीत संस्थानला पंढरपूरकडे जाण्यास परवानगी दिली. त्यातही कोरोनाची टेस्ट आणि विविध अटी होत्या. शासनाच्या पत्रानुसार संस्थानने सर्व तयारी केली. मुख्य देऊळवाड्यात मंगळवारी पहाटे काकडा झाला. संत तुकाराम शिळा मंदिरात संस्थानच्या विश्वस्तांच्या वतीने आरती झाली. भजनी मंडपात संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पूजा संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे यांच्या हस्ते पूजा झाली. तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही मधुकर महाराज मोरे यांनी सपत्निक महापूजा आरती केली. त्यानंतर सकाळी सात ते नऊ यावेळेत देहूकरांचे किर्तन झाले. संपूर्ण देऊळवाड्याला पुणे येथील ताम्हाणे कुटुंबियांनी आकर्षक फुलांची सजावट केली होती. दुपारी बारा वाजता भजनी मंडपात पंचपदी झाली. त्यानंतर डोक्यावर तुकोबांच्या पादुका घेवून मंदिर प्रदक्षिणा झाली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रदक्षिणे दरम्यान देहूकर दिंडीकरांनी सुंदर ते ध्यान, सदा माझे जडो तुझे मुर्ती, श्री संताचिया माथा चरणी, उजळले भाग्य आता हे अभंग झाले. प्रदक्षिणा झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पादुका डोक्यावर घेवून इनामदार वाड्याजवळ एसटीबस मध्ये पादुका ठेवण्यात आल्या. यावेळी संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे व इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूने ग्रामस्थ उभे होते. भाविकांनी एसटी बसवर फुलांचा वर्षाव केला. वाटेवर परंडवाल चौकातील अनगडशावली दर्ग्यात आरती झाली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माळवाडी येथील परंडवाल कुटुंबियांनी पादुकांचे स्वागत केले. "सुख पंढरिये आले | पुंडलिकें साठविले || घ्यारे घ्यारे माझे बाप| जिव्हा घेऊनि खरे माप|| करा एक खेप | मग नलगे हिंडणे||" खरे सुख पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनात आहे. त्यामुळे वर्षातून एकदा आषाढी एकादशीला जावे अशी भावना वारकऱ्याच्या मनात असते. त्यानुसार तो वारीत येत असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे संपूर्ण विश्वालाच त्रास होत आहे. त्यामुळे वारी रद्द झाल्याचे दुःख न दाखवता वारकरी आपल्या मनातून सावळ्या विठोबाचे दर्शन घेत आहे, याची प्रचिती देहूत येत होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the way from Tukaram maharaj paduka to Pandharpur