....तर, वीज निर्मितीसाठी जाणाऱ्या पाण्याचा बोगदा बंद पाडू

मकरंद ढमाले
बुधवार, 2 मे 2018

माले (पुणे) : 'मुळशी वाघवाडी पुलाच्या संदर्भात एक महिन्यात काही हालचाली न झाल्यास टाटा पॉवर कंपनीचा वीज निर्मितीसाठी जाणाऱ्या पाण्याचा बोगदा एक जून रोजी बंद करू' असा इशारा माजी आमदार शरद ढमाले यांनी दिला.

माले (पुणे) : 'मुळशी वाघवाडी पुलाच्या संदर्भात एक महिन्यात काही हालचाली न झाल्यास टाटा पॉवर कंपनीचा वीज निर्मितीसाठी जाणाऱ्या पाण्याचा बोगदा एक जून रोजी बंद करू' असा इशारा माजी आमदार शरद ढमाले यांनी दिला.

मुळशी धरणातील गावांना जाण्यासाठी मुळशी वाघवाडी पुलाच्या मागणीसाठी आज पुलाच्या ठिकाणी पोहून आंदोलन केले. रिपाईचे जिल्‍हा संपर्कनेते श्रीकांत कदम, उद्योजक नंदुशेठ वाळंज, भाजपचे जिल्‍हा उपाध्‍यक्ष दत्‍तात्रेय सुर्वे, विश्व हिंदू परिषदेचे पुणे महानगरचे प्रमुख आचार्य श्रीकांत स्वामी, भाजपचे तालुकाध्‍यक्ष अशोक साठे, कार्याध्‍यक्ष राजेंद्र बांदल, उपाध्‍यक्ष बाळासाहेब कुरपे, सरचिटणीस विनायक ठोंबरे, राष्‍ट्रवादीचे धरण विभागाचे माजी अध्‍यक्ष विठठल पडवळ, राष्‍ट्रवादी युवकचे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर दाभाडे, आंबवणेचे माजी सरपंच गणपत मेंगडे, वडगावच्‍या सरपंच अर्चना वाघ, तिस्‍करीच्‍या सरपंच सुवर्णा कदम, भांबर्डेचे सरपंच श्रीराम वायकर, रमेश जोरी, लक्ष्‍मण ठोंबरे, गोविंद सरुसे, एकनाथ दिघे, विजय दळवी, विनोद सुर्वे, प्रशांत जोरी, नवनाथ दाभाडे, रामचंद्र देवकर, उमेश साखरे तसेच धरणग्रस्‍त ५२ गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

ढमाले म्‍हणाले, 'टाटा पॉवर कंपनी व सरकारी अधिकारी यांच्या मानसिकतेमुळे धरण भागातील मुळशी ते वाघवाडी या पुलाचे काम रखडले आहे. टाटा पॉवर कंपनीस वीज निर्मिती करण्यास मुदत वाढ देऊ नये. असे मुळशी धरण भागातील सर्व ग्रामपंचायतीने ठराव करावेत. पुणे-कोलाड राष्‍ट्रीय महामार्गाचे काम होताना त्‍यात पुलाचा समावेश करावा. एक महिन्‍यात पुलाच्‍या कामास निधी मिळून गती न आल्‍यास टाटाचे वीज निर्मितीसाठी जाणारे पाण्‍याचा बोगदा बंद करु.' 

वाघवाडी येथे सकाळी महाराष्ट्र दिनानिमित्त तिरंगा झेंडावंदन केले. त्यानंतर, स्थानिक नागरिकांना आंदोलनाची दिशा सांगितली. त्यांनतर त्यांनी पाण्यात उतरून नियोजित पुलाच्या ठिकाणी सुमारे पाचशे मीटर अंतर वाघवाडी बाजुने पोहून मुळशीकडे येत जलतरण प्रवास केला. कदम, वाळंज, पडवळ, लक्ष्‍मण वाघ यांनी मनोगत व्‍यक्‍त करुन पाठिंबा दिला. महसुल, पोलिस, टाटा पॉवर कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. 

मुख्‍यमंत्र्यांनी घेतली दखल
मुळशी-वाघवाडी पुलासाठी माजी आमदार शरद ढमाले यांनी केलेल्‍या जलतरण प्रवास आंदोलनाची मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली. संबंधित विभागांना पुलाबाबत तातडीने कार्यवाही करण्‍याच्‍या सुचना दिल्‍या. तसा ईमेल त्‍यांनी पाठवला. मुख्‍यमंत्री कार्यालयाकडून त्‍याची प्रतही मिळाल्‍याची माहिती भाजपाचे तालुका अध्‍यक्ष अशोक साठे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: we can stop water tunnel for electricity supply if demands are not completed