#WeCareForPune ‘वुई केअर फॉर पुणे’चा नारा

सचिन कोळी
मंगळवार, 9 एप्रिल 2019

डिजिटल तंत्रज्ञानात अग्रेसर असलेल्या दैनिक ‘सकाळ’ने शेवटच्या घटकांपर्यंत पोचून संवाद साधण्याचा केलेला प्रयत्न लोकाभिमुख ठरणार असल्याची भावना सभासदांनी व्यक्त करतानाच ‘वुई केअर फॉर पुणे’चा नारा दिला.

कात्रज - बीआरटी आणि त्यापाठोपाठ रखडलेले पुनर्विकासाचे काम, प्रलंबित असलेले कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गाचे रुंदीकरण, कोंडीत अडकलेला कात्रज चौक, विकास आराखड्यातील रखडलेले रस्ते आणि त्यामुळे वाहतूक कोंडीने गुदमरलेल्या भारती विद्यापीठ परिसरातील चौक या समस्यांचा सातत्याने सामना करणाऱ्या मोरेबाग परिसरातील पंधरा सोसायट्यांतील पदाधिकाऱ्यांनी ‘सकाळ संवाद’ मध्ये सहभागी होत आपल्या समस्या मांडल्या.

डिजिटल तंत्रज्ञानात अग्रेसर असलेल्या दैनिक ‘सकाळ’ने शेवटच्या घटकांपर्यंत पोचून संवाद साधण्याचा केलेला प्रयत्न लोकाभिमुख ठरणार असल्याची भावना सभासदांनी व्यक्त करतानाच ‘वुई केअर फॉर पुणे’चा नारा दिला.  

कात्रज येथील मोरेबाग परिसरातील पंधरा सोसायट्यांतील सभासदांनी आज दैनिक ‘सकाळ’च्या ‘सकाळ संवाद’ उपक्रमांतर्गत संवाद साधला. सावंत विहार फेज एक, दोन व तीन, सिक्‍स्थ सेंन्स, सांवत गार्डन, आगम दर्शन, माणिक मोती, अजिंक्‍य समृद्धी, सनशाइन यासह अनेक सोसायट्यांच्या पदाधिकारी व सभासदांनी या उपक्रमात सहभाही होऊन आपल्या समस्या, सूचना ‘सकाळ’कडे मांडल्या.

नागरिकांच्या प्रतिक्रिया
ज्योती ढमाळ (आगम दर्शन सोसायटी) -
 झपाट्याने वाढलेल्या नागरिकरणामुळे या परिसरातील सोसायटी समूहाभोवती अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. एमएनजीएलसाठी खोदाई होताना नागरिकांनी प्रचंड त्रास सहन केला आहे; परंतु सोसायट्यांना गॅस मिळालेला नाही. महिलांसाठी स्वतंत्र बसची संख्या वाढवली पाहिजे, ही मागणी सातत्याने करूनही कोणीच दखल घेत नाही.

राजेंद्र घाटगे, (सनशाइन सोसायटी) - भूमिगत वीजवाहिन्यांची कामे अनेक ठिकाणी झाली आहेत. त्यानंतर जुने विजेचे खांब आणि तारा काढण्याचे काम आजपर्यंत झालेले नाही. परिणामी त्यालगतच्या झाडांची वाढ खुंटली आहे. दिरंगाईचा फटका सर्वसामान्यांना बसतोच आहे, त्याचवेळी वृक्षवाढीवर परिणाम होतोय. त्यासाठी निरुपयोगी सांगाडे काढून वाहतुकीला होणारी अडचण दूर करावी.

अनंत शिर्के (सावंत गार्डन सोसायटी) - कात्रज चौकालगतच्या या सोसायट्यांभोवताली अनेक जटील समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी ‘सकाळ’ सतत पाठपुरावा करत आहे. पाठोपाठ ‘सकाळ संवाद’ ॲप या काळात प्रभावी ठरत आहे. प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांची संख्या सतत वाढत आहे. वर्षाकाठी अठरा ते वीस लाख पर्यटक प्राणिसंग्रहालय पाहाण्यासाठी येतात. त्यांना बहुमजली पार्किंगची व्यवस्था देण्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. 

रघुनाथ कड (सावंत विहार फेज दोन) - मोरेबाग परिसरातील एसटी महामंडळाच्या बसथांब्यालगत उभारलेले स्वच्छतागृह नागरिकांसाठी खुले करणे आवश्‍यक आहे. चारशे एसटी बस दिवसभरात थांबतात. तब्बल पाच हजार प्रवाशांचा विचार करून स्वच्छतागृह तत्काळ सुरू करणे आवश्‍यक आहे.

समताराजे शिंदे - बाह्यवळण मार्ग आणि सातारा रस्ता प्रचंड वाहतुकीने ओसांडून वाहत आहेत. त्याचवेळी भारती विद्यापीठ परिसरातील अंतर्गत रस्ते आणि चौक वाहतूक कोंडीने व्यापून गेले आहेत. पर्यायी रस्ते निर्माण करणे आवश्‍यक आहे. विकास आराखड्यातील रस्ते रखडून ठेवून नागरिकांना वेठीस धरले जात आहे.

पंकज शहा (सावंत विहार फेज दोन) - या पंधरा सोसायट्यांना सातारा रस्त्याकडून आत येण्यासाठी असलेला एकमेव मार्ग धोकादायक ठरत आहे. सातारा रस्ता बीआरटी मार्ग वाहतुकीने व्यापून गेला आहे. त्याला भेदून सोसायटीकडे वळणे जिकीरीचे ठरत आहे. तेथे पाथ वे आणि सिग्नलची उभारणी आवश्‍यक आहे.

भरगुडे - सार्वजनिक विकास होत असताना सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालये आणि अभ्यसिकांची व्यवस्था करणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भवितव्य घडवण्यासाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. त्यांना स्वस्त आणि सोईस्कर अभ्यासिका देणे ही जबाबदारी आहे. आगम दर्शन सोसायटीलगत आरक्षित जागेत अभ्यासिका उभारल्यास या परिसरातील विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल. अंतर्गत रस्त्यावर बेकायदा पार्किंगवर कारावाई व्हावी. 

संजय काकडे (शत्रुंजय सोसायटी) - कमी उंचीचा आणि अरुंद दत्तनगरचा भुयारी मार्ग गेली अनेक वर्षे वाहतूक कोंडीचे केंद्र ठरत आहे. बाह्यवळण मार्गाचे रखडलेले रुंदीकरण परिणामी होणारी वाहतूक कोंडी सर्वसामान्यासाठी प्रचंड त्रासदायक ठरत आहे.

बबन भोसले (सावंत गार्डन) - सातारा रस्ता पुनर्विकासात पार्किंगच्या जागेत फळविक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. अनेक टुर्स ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बस गॅरेजवाल्यांची वाहने रस्त्यावरचा ताबा सोडण्यास तयार नाहीत. दंडात्मक कारवाया सातत्याने होणे आवश्‍यक आहेत.

अतीष जाधव (श्रीराम दर्शन) - लोकसंख्या वाढत असताना त्या वेगाने विकास करण्यात महापालिका अपयशी ठरली आहे.

Web Title: We Care For Pune BRT Redevelopment Work