#WeCareForPune आणखी तीन ठिकाणी विलगीकरण कक्ष

Coronavirus
Coronavirus

पुणे -  परदेशातून आलेल्या प्रत्येक नागरिकाला २४ तास विलगीकरण कक्षात ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. अशा नागरिकांना ठेवण्यासाठी महापालिकेकडून तीन नवीन ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी सुमारे दीडशे ते दोनशे जणांची व्यवस्था होणार आहे.

देशभरात सर्वाधिक पर्यटन करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यातही पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत. तसेच, पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरात औद्योगिक वसाहती आहेत. त्यामुळे परदेशात ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे जिल्हा प्रशासनाने परदेशवारी करून आलेल्या प्रत्येक प्रवाशाची विमानतळावरच तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विमानतळावर तपासणी करून अशा प्रवाशांना घरीच विलगीकरण कक्षात राहण्याची सूचना दिली जात होती. घरी सोडल्यानंतर त्या नागरिकांमध्ये संसर्गाची लक्षणे दिसून येऊ लागली आहेत, त्यामुळे परदेशातून आलेल्या प्रत्येक नागरिकाला २४ तास संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवावे, अशी सूचना राज्य सरकारने नव्याने केली आहे.

पुणे महापालिकेकडून यापूर्वी डॉ. नायडू रुग्णालय वगळता सिंहगड रस्त्यावरील लायगुडे दवाखाना, सणस मैदानाजवळील इमारत आणि बोपोडीतील महापालिकेच्या मालकीच्या इमारतींमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. पण, सरकारच्या नव्या सूचनेनुसार त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात खराडी येथील रक्षकनगरमधील स्पोर्ट्‌स ग्राउंडमधील इमारत आणि पठारे कुस्ती संकुल येथील इमारत आणि वानवडी येथे सांस्कृतिक भवनच्या इमारतीमध्ये नव्याने विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

विलगीकरण कक्षात सर्व सोयी
महापालिकेकडून तयार करण्यात येत असलेल्या या विलगीकरण कक्षात सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पाणीपुरवठा, जेवणापासून दूरचित्रवाणी, वायफाय, कॅरम, बुद्धिबळ अशा सोयींचा त्यात समावेश आहे.

नवीन कक्ष
रक्षकनगरमधील स्पोर्ट्‌स ग्राउंडमधील इमारत, खराडी
पठारे कुस्ती संकुलातील इमारत, खराडी
सांस्कृतिक भवन, वानवडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com