आम्हीच ठरवतो टोलचे नियम!

सलील उरुणकर - @salilurunkar
शनिवार, 21 जानेवारी 2017

पत्रकार म्हणून सवलत नको 
तुम्ही आधी सांगितले असते, की पत्रकार आहात, तर आम्ही केव्हाच सोडले असते, असा बचावात्मक पवित्रा टोल कर्मचारी आणि स्थानिक पोलिसांनी घेतला. मात्र ‘‘पत्रकार म्हणून सवलत नको आहे. सामान्य नागरिकांसाठी नियमानुसार ज्या सवलती आहेत तेवढ्याच पाहिजे आहेत. नियम एकसारखे ठेवले तर आमची पैसे भरण्याचीही तयारी आहे,’’ असे सांगितल्यानंतरही टोल कर्मचारी आणि स्थानिक पोलिसांनी ऐकले नाही. अखेर ‘नॉट पेड’ अशी नोंद करून गाडी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

खेड शिवापूर टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची दमदाटी

पुणे - ‘‘आम्हीच ठरवतो टोलचे नियम... तुम्हाला पैसे भरावेच लागतील... तुम्हाला काय करायचे ते करा... पोलिसांना बोलवा, नाहीतर आणखी कोणाला... पण, तुम्हाला येथून सोडणार नाही... क्रेन मागवून उचलून नेऊ तुमची गाडी...’’ अशा उर्मट भाषेत आणि उद्धटपणे खेड शिवापूर टोल नाक्‍यावरील कर्मचारी सामान्य नागरिकांशी बोलत असल्याचा अनुभव आला. टोल नाक्‍याच्या परिसरातील गावांसह कात्रज भागातील नागरिकांना या नाक्‍यावर टोल माफ असतानाही स्थानिक पोलिसांच्या संगनमताने नागरिकांची लूट करत आहेत. 

कोल्हापूरला एका कामाला जाण्याच्या निमित्ताने खेड शिवापूर टोल नाक्‍यावर आलेला हा अनुभव. बुधवारी रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान मोटारीने खेड शिवापूर टोल नाका ओलांडला, त्या वेळी वाहन परवाना दाखविला. त्यावरील पत्त्याची खातरजमा करून संबंधित कर्मचाऱ्याने टोल शुल्क न घेता गाडी सोडली. मात्र, गुरुवारी रात्री पुण्याकडे परत येताना दुसऱ्या कर्मचाऱ्याने स्वतःचाच नियम लागू करून अर्वाच्य भाषा वापरण्यास सुरवात केली. ‘‘आदल्या रात्री झालेली मोटारीची नोंद बघा... यापूर्वीही अनेकदा ही सवलत घेतलेली आहे...’’ अशा विनवण्या करूनही टोलवरील कर्मचारी लक्षही देत नव्हता.

‘‘पैसे देत नाही तोपर्यंत तुमची गाडी सोडणार नाही, कोणाला बोलवायचे ते बोलवा अथवा कोठेही जा,’’ असा दम कर्मचारी देऊ लागला. यानंतर त्याने वरिष्ठ अधिकाऱ्याला तेथे बोलावून घेतले. त्यानंतर तुम्हा सर्वांचे सीसीटीव्ही चित्रीकरण करून, गुन्हा दाखल करतो, अशी धमकी देण्यास सुरवात केली. शिवाय, आम्ही कोणाला घाबरत नाही, असे म्हणून हुज्जत घालायला सुरवात केली. हुज्जतीनंतर प्रकरण पोलिसांपासून अधिकाऱ्यांपर्यंत गेले. पत्रकारांची मोटार असल्याचे समजल्यानंतर पोलिस आणि टोल नाक्‍यावरील कर्मचारी समंजस भूमिका घेऊ लागले.

नगरसेवक वसंत मोरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘स्थानिक नागरिकांना खेड शिवापूर टोल नाक्‍यावर सवलत मिळावी यासाठी आम्ही आंदोलन केले होते, त्यामुळे नागरिकांची अशा प्रकारे अडवणूक होणे चुकीचे आहे.’’

गुटखा खाऊन पोलिसांची ‘ड्यूटी’
पोलिस नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिल्यानंतर नजीकच्या चौकीतून कॉन्स्टेबल अजय शिंदे, हवालदार खांडेकर आणि अन्य कर्मचारी  साध्या कपड्यांमध्ये नाक्‍यावर पोचले. तोंडात गुटखा टाकून ‘ड्यूटी’वर असलेल्या कॉन्स्टेबल शिंदे आणि खांडेकर यांनी टोलवरील कर्मचाऱ्यांचीच तळी उचलून धरली. ‘‘तुम्ही कोण लागून गेला नियम ठरविणारे... पैसे भरा आणि निघा’ अशी भाषा वापरत शिंदे याने मूळ तक्रारीकडेच दुर्लक्ष केले.

Web Title: We decide toll rules!