जिकडे तिकडे एकच चर्चा, 'त्या' बाळाला आम्ही सांभाळतो...

baby.jpg
baby.jpg

कोथरुड (पुणे) : चांदणी चौक येथे गोंडस बाळ सापडल्याचे वृत्त सकाळमध्ये प्रसिध्द होताच, हळहळ व्यक्त करत त्या बाळाला आम्ही सांभाळतो असे असंख्य फोन आले. कोथरुड पोलिस ठाण्याच्या वरीष्ठ पोलिस निरिक्षक प्रतिभा जोशी यांनी सांगितले की, मला मिलेट्रीमधील पाच वरीष्ठ अधिकारी, असंख्य पोलिस अधिकारी व कर्मचारी, खासदार सुप्रिया सुळे यांच्या पीए, तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींचे फोन आले. या सर्वांनी बाळाची चौकशी करत आम्ही या बाळाचा व्यवस्थित सांभाळ करतो, कायदेशीर प्रक्रिया काय करायची ते सांगा अशी विचारणा केली.

चांदणी चौकात असलेल्या एका झाडाखाली ठेवलेले हे बाळ श्रीधर गोरे व अंबरीश अरसनाळ या युवकांना दिसले त्याबाबत त्यांनी पोलिसांना कळवल्यावर बाळाला कोथरुड पोलिस ठाण्यात नेण्यात आले. दरम्यान सोशल मिडीयावर बाळ सापडल्याची बातमी सगळीकडे व्हायरल झाली होती. सहाय्यक पोलिस निरिक्षक सुयश जोशी यांनी विमलाबाई गरवारे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या व्हॉटसअप ग्रुपवर बाळाचा फोटो टाकला होता. बिपीन आवटे यांनी हा फोटो पाहताच त्याच्या मित्राच्या भाडेकरुचे हे बाळ असल्याचे ओळखले. बाळाच्या पालकांनी कोथरुड पोलिस ठाण्यात संपर्क साधला व बाळ ताब्यात घेतले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

बाळाचे वडिल तुकाराम पांडुरंग क्षिरसागर (वय ३६, रा. आंबेगाव खुर्द) हे सुतारकाम करतात. मुलीला दवाखान्यात दाखवायला नेते असे सांगून पत्नी लक्ष्मी या दुपारी निघून गेल्या. बराच वेळ झाला तरी लक्ष्मी घरी आली नाही म्हणून त्यांनी बावधन येथे असलेली लक्ष्मीची बहिण व सुतारदरा येथे असलेल्या भावाकडे चौकशी केली. परंतु तेथेही लक्ष्मी आली नसल्याचे समजले. दरम्यान व्हॉटसअपवर आपल्या बाळाचा फोटो व्हायरल झाल्याचे त्यांना समजले. कोथरुड पोलिस स्टेशनमध्ये येवून त्यांनी बाळाचा ताबा घेतला. पहाटे तीनच्या दरम्यान लक्ष्मीने घरी फोन केला. तेव्हा ती वारजे पुलाखाली असल्याचे समजले. कोथरुड पोलिसांनी लक्ष्मी वर कलम ३१७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील सुनावणीसाठी आज लक्ष्मी यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येईल.

या प्रकरणात अधिक चौकशी केली असता असे समजले की, क्षिरसागर यांची लक्ष्मी ही दुसरी पत्नी आहे. तिला कोड असल्याने तिच्याशी घरचे नीट बोलत नव्हते. क्षिरसागर यांच्या पहिल्या पत्नीने आत्महत्या केली होती. तिला एक मुलगी आहे. लक्ष्मी यांना एक मुलगा व मुलगी आहे. घरात वाद होत असल्याने त्यांनी घरच्यांना मी आता वैतागले आहे असे कळवले होते.  

आता तरी मुलीला नीट सांभाळा...

कोथरुड पोलिसांनी लक्ष्मी व तुकाराम क्षिरसागर या दांपत्याचे समुपदेशन करत व्यवस्थित राहण्याची समज दिली. कौटुंबिक वादविवादाचा परिणाम बाळाच्या वाढीवर होतो. आता वादविवाद बाजूला ठेवून सुखाने संसार करा व बाळाला नीट सांभाळा असे वरीष्ठ पोलिस निरिक्षक प्रतिभा जोशी यांनी दोघांना समजावले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com