आगामी काळातही गणेशोत्सवात हवी विधायकता  

Ganeshotsav
Ganeshotsav

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने व संयमाने साजरा करण्यात आला. आगामी काळातील गणेशोत्सवही दिमाखदार परंतु लोकांना सुसह्य कसा साजरा करता येईल, यासाठी नवनव्या कल्पनांचे बीज कसे रूजवता येईल आणि काही नव्या विधायक गोष्टी कशा सुरू करता येईल, यासाठी पुढाकार घेऊन बदल करणे आवश्‍यक आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या गणेशोत्सवातील एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून मी अनेक वर्षे विविध गणेश मंडळांसोबत कार्यरत आहे. यंदा कोरोनामुळे जी काही परिस्थिती आजूबाजूला निर्माण झाली होती आणि जे संकट डोळ्यांसमोर दिसत होते, ते पाहता यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव अतिशय साधेपणाने आणि घरातल्या घरात करावा लागणार आहे, हे लक्षात येत होते. त्यामुळे मन काहीसे खट्टूसुद्धा झाले.

लोकहितासाठी यंदाचा गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करावयाचा आहे, ही बाब महाराष्ट्रातील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मनी, ध्यानी ही गोष्ट पक्की रुजवली होती, समजून घेतली होती. पुण्यातील नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी ज्या साधेपणाने, संयमाने उत्सव साजरा केला, त्यासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायलाच हवी. गणेशोत्सव मंडळांनी आत्मचिंतन केले आणि लोकांच्या हिताला, सुरक्षिततेला प्राधान्य दिले. अनेक मंडळांनी या वर्षी मांडवसुद्धा घातले नाहीत. गणेशोत्सवातील कार्यक्रमांना, मिरवणुकीला आणि जल्लोषाला फाटा दिला. हे सारे पाहिले आणि लक्षात आले की, अशाही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करता येऊ  शकतो की! कमीत कमी जागेचा वापर करून उत्सव करणे, भव्यदिव्यता कमी करणे आपल्या हातात नक्की आहे. त्यासाठी असे काही संकट असायलाच हवे असे नाही. 

पुण्यातील मिरवणुकांमध्ये ज्या रस्त्यावरून सुमित्रा आणि अनारकली हत्तीण गेली, ज्या रस्त्यावरून जल्लोषपूर्ण मिरवणुका निघाल्या, सजवलेले रथ निघाले. सगळा परिसर दहा दिवस दिव्यांच्या रोषणाईने उजळलेला असायचा आणि गणेशभक्तांचा ओघ थांबता थांबायचा नाही. ते सगळे वातावरण बदलून यंदाच्या वर्षी तिथे आलेली नीरव शांतता काहीशी अस्वस्थ करून जाणारी नक्कीच होती. पण गणेशोत्सवातील प्रत्येक कार्यकर्ता हे सारे संयमाने आणि समजूतदारपणाने घेत होता. त्याच श्रद्धेने, ध्येयाने, त्यागाने, प्राणपणाने या संकटाचा सामना करीत होता. त्या कार्यकर्त्याला आपण मनापासून मानाचा मुजरा करायलाच हवा. 

या वर्षीच्या उत्सवातील आणखी एक जाणवलेली चांगली बाब म्हणजे, गेल्या १०० वर्षांतील मिरवणुकीच्या काळातील आवाजाचे प्रदूषण मोजले तर यंदाचे वर्ष त्यादृष्टीने विक्रमी ठरले कारण यंदा मिरवणुका निघाल्याच नाहीत. शतकातला सर्वांत कमी म्हणजे ५९.८ डेसिबल इतकाच आवाज नोंदला गेला. संयमाने काढलेल्या मिरवणुकीचे हे प्रत्यंतर होते. अनेक मंडळांनी मांडवातच गणरायाचे विसर्जन केले. त्यामुळे एरवी मिरवणुकीच्या काळात जेवढा ताण पोलिसांवर येतो. तोही यंदाच्या वर्षी आला नाही. 

संकट आले की त्यातूनच नवनव्या कल्पनांचाही जन्म होत असतो. पुनीत बालन या कार्यकर्त्याने नवी कल्पना पुढे आणली. सहकारी मित्रांना सोबत घेऊन अखिल भाऊ रंगारी गणपतीच्या माध्यमातून देशभरातील दिग्गज कलाकारांना एकत्र आणून, ऑनलाइन महोत्सव साजरा केला. भारताच्या सार्वजनिक गणेशोत्सवातील असा पहिलाच उत्सव असेल. 

यंदा संकटाच्या निमित्ताने मिळालेला बोध आपण लक्षात ठेवून, पुढील वर्षीच्या गणेशोत्सवाला अधिक विधायक दिशा देण्याच्या दृष्टीने विचार व्हावा.

पुण्यातील धुरिणांनी या निमित्ताने एकत्र यावे आणि चांगली परिस्थिती असताना अधिक चांगला, दिमाखदार परंतु लोकांना सुसह्य कसा साजरा करता येईल, यासाठी नवनव्या कल्पनांचे बीज कसे रूजवता येईल आणि काही नव्या चांगल्या गोष्टी कशा सुरू करता येईल, यासाठी पुढाकार घेऊन बदल करणे आवश्‍यक आहे. भविष्यात अधिक चांगला, लोकोपयोगी आणि विधायक स्वरूपातील गणेशोत्सव करण्यासाठी गणरायाने दृष्टी द्यावी, हीच प्रार्थना करतो. 

काय करता येईल?

  • कमीत कमी जागेचा वापर   
  • ध्वनीप्रदूषणावर मात करता येईल 
  • पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी प्रयत्न  
  • लोकांच्या हिताला व सुरक्षिततेला प्राधान्य
  • लोकोपयोगी उपक्रमांवर भर देता येईल
  • विधायक कार्यक्रमांना प्राधान्य
  • दिमाखदार हवा, पण लोकांना सुसह्य व्हावा
  • नवनवीन कल्पनांचे बीज रूजवता येईल

(शब्दांकन : पराग पोतदार)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com