esakal | 'आम्ही निधी देऊ, पण रेमडेसिव्हीर, ऑक्सिजन द्या'; पुणे महापौरांची मागणी

बोलून बातमी शोधा

Murlidhar Mohol
'आम्ही निधी देऊ, पण रेमडेसिव्हीर, ऑक्सिजन द्या'; पुणे महापौरांची मागणी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजनचा पुरेशा प्रमाणात पुरवठा करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजनसाठी आम्ही निधी देऊ, पण दोन्हींचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे.

महापौर मोहोळ यांच्यासमवेत सभागृह नेते गणेश बीडकर आणि स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने उपस्थित होते. रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजनचा पुरवठा करण्याबाबत नियंत्रणाची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाची आहे. महापौर मोहोळ म्हणाले, कोरोना चाचण्यांसोबतच रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड्स, आयसीयू बेड्सची उपलब्धता आणि नागरिकांचे लसीकरण यावर युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहोत. महापालिकेच्या स्तरावर रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. याशिवाय खासगी रुग्णालयांतील ८० टक्के बेड्स ताब्यात घेऊन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परंतु सध्या रेमडेसिव्हीरचा पुरवठा अत्यल्प आहे. त्यामुळे रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत.

रुग्णालयांच्या ऑक्सिजन यंत्रणेचे ऑडिट

नाशिकच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व रुग्णालयांच्या ऑक्सिजन यंत्रणेचे फायर ऑडिटच्या धर्तीवर ऑडिट करण्यात यावे. तसेच, याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना महापौर मोहोळ यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.