‘वेकोली’च्या खाणी ‘रेयर अर्थ’ने समृद्ध नागपूरमधील कंपनीला सहा खाणीत सापडली दुर्मिळ खनिजे
सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. २७ ः नागपूरमधील वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने (वेकोली) खनिज उत्खनन क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. वेकोलीच्या सहा कोळसा खाणींमध्ये आठ अत्यंत महत्त्वाची दुर्मिळ खनिजे सापडली आहेत. कोळसा उत्पादनाबरोबरच आता ‘वेकोली’ या मौल्यवान खनिजांच्या उत्पादनातही मोठी झेप घेणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
‘वेकोली’च्या ज्या सहा खाणींमध्ये हे साठे आढळले आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने अदासा (भूमिगत ते खुली खाण), मकरधोकडा-तीन, दुर्गापूर, गौरी-पाणी, मुंगोली-निरगुडा आणि येकोना एक व दोन या खुल्या किंवा जमिनीवरील खाणींचा समावेश आहे. या खाणींमधील ‘ओव्हरबर्डन’ म्हणजेच कोळशाच्या थरावरील माती व टाकाऊ उपपदार्थांच्या शास्त्रीय विश्लेषणानंतर ही खनिजे मोठ्या प्रमाणात असल्याचे समोर आले आहे. यामध्ये पोटॅश, टेल्युरियम, टायटॅनियम, लॅन्थॅनम, सेरियम, रेनियम, सेलेनियम आणि झिरकोनिअम यांसारख्या उच्च मूल्य असलेल्या खनिजांचा समावेश आहे. ही सर्व खनिजे आधुनिक तंत्रज्ञान, संरक्षण क्षेत्र आणि हरित ऊर्जेसाठी अत्यंत अनिवार्य मानली जातात.या शोधामुळे ‘वेकोली’च्या खाणींमधून निघणारा कचरा किंवा टाकाऊ माती आता उत्पन्नाचे मोठे साधन ठरणार आहे. ‘कचऱ्यातून संपत्ती’ निर्मितीचे हे उत्तम उदाहरण ठरेल असा दावाही त्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
स्वयंपूर्णतेकडे पाऊल
या प्रकल्पासाठी कोल इंडिया आणि हैदराबाद येथील ''नॉन-फेरस मटेरिअल्स टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट सेंटर'' (एनएफटीडीसी) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प उभारून खनिजांचे शुद्धीकरण केले जाईल. भविष्यात कोळशाची मागणी मर्यादित झाली तरी या दुर्मिळ खनिजांमुळे ‘वेकोली’ची आर्थिक स्थिती भक्कम राहणार आहे. या शोधामुळे भारत आता धोरणात्मक खनिजांच्या बाबतीत स्वयंपूर्णतेकडे पाऊल टाकत आहे. संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राचे योगदान भविष्यात मोलाचे ठरणार आहे.
पाचशे नमुन्यांची चाचणी
पहिल्या टप्प्यात ५०० नमुने हैदराबाद येथे पाठविण्यात आले होते. त्यात हे दुर्मिळ खनिज असल्याचे उघड झाले आहे. लवकरच अधिक प्रमाणात नमुने पाठविण्यात येणार आहे. त्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर ‘वेस्टन कोल फिल्ड लिमिटेड’ कोळशाबरोबरच इतर खनिजांसाठीही ओळखली जाईल. इतर सार्वजनिक कंपन्यांमध्ये संशोधनात ‘वेकोली’ने आघाडी घेतली असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
खनिजांचे महत्त्व अनन्यसाधारण
पोटॅश ः खत आणि कृषी-रसायन उद्योगासाठी वापर
टेल्युरियम ः सौर ऊर्जा आणि सेमीकंडक्टरसाठी आवश्यक
टायटॅनियम ः अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापर
लॅन्थॅनम आणि सेरियम ः इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) मोटार आणि बॅटरीसाठी तर रेनियम जेट इंजिनसाठी महत्त्वाचे
सेलेनियम आणि झिरकोनिअम ःअणुऊर्जा प्रकल्प आणि काच निर्मिती उद्योगात वापर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

