

PNE26W18036
अहिल्यानगर ः लग्नसमारंभांतून दागिने चोरणाऱ्या टोळीकडून कोतवाली पोलिसांनी १६ तोळे सोने हस्तगत केले आहे.
--------------------------
चोरीचे १६ तोळे सोने जप्त
कोतवाली पोलिसांकडून दागिने चोरणाऱ्यांच्या टोळीचा छडा
अहिल्यानगर, ता. ९ ः अल्पवयीन मुलांच्या माध्यमातून लग्नसमारंभांतून दागिने चोरणाऱ्या परप्रांतिय टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. कोतवाली पोलिसांनी मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील टोळीचा छडा लावला आहे. केडगावातून चोरलेले १६ तोळ्यांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
केडगाव येथील श्रेया गार्डनमध्ये २ मे रोजी रात्री आयोजित साखरपुडा समारंभात शिक्षिका सिंधू महेश माने (वय ५२, रा. तिसगाव, ता. पाथर्डी) यांच्या कापडी पिशवीत ठेवलेले १६ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. समारंभातील गर्दी आणि वीज गेल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केली. कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल होताच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता, एक अल्पवयीन मुलगा संशयित म्हणून समोर आला. तपासादरम्यान हा प्रकार एका संघटित टोळीमार्फत घडवून आणण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे आणि कोतवालीचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे यांच्यासह पोलिस अंमलदार विनोद बोरगे, विशाल दळवी, सूरज कदम यांचे विशेष पथक मध्यप्रदेशात रवाना झाले. राजगड जिल्ह्यातील बोटा पोलिस ठाणे हद्दीतील चार गावांमध्ये स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोन दिवस विशेष कोबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या कारवाईदरम्यान उत्तरप्रदेश, दिल्ली व गोवा पोलिसांची पथकेही त्याच भागात दाखल झाली होती. कारण, या भागातील काही टोळ्या देशभरातील चोरीच्या गुन्ह्यांत - सक्रिय असल्याची नोंद विविध राज्यांच्या पोलिसांकडे आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीत दिसणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या नातेवाईकांना ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसांनी दाखविलेल्या पुराव्यांनंतर संबंधितांनी चोरीची कबुली दिली. चोरीतील सोन्याचे दागिने पोलिसांच्या ताब्यात दिले.
--------------------------
धोकादायक भागात मोहीम
राजगड जिल्ह्यातील बोटा पोलिस ठाणे हद्दीतील चार गावांमध्ये लग्न समारंभात दागिने चोरणाऱ्या टोळ्यांचे जाळे सक्रिय आहेत. पोलिस या गावांमध्ये तपासासाठी गेलेल्या त्यांच्यावर हल्ल्याच्या घटनाही पूर्वी घडल्या आहेत. चोरी करणारा मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला नोटीस देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.