esakal | पश्‍चिम महाराष्ट्रातील विकासप्रक्रिया ठप्प - अजित पवार

बोलून बातमी शोधा

Ajit-Pawar
पश्‍चिम महाराष्ट्रातील विकासप्रक्रिया ठप्प - अजित पवार
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेत नाही. या भागातील विकासप्रक्रिया गेल्या साडेतीन वर्षांत पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे जनतेच्या भावना तीव्र असून, त्याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पश्‍चिम महाराष्ट्रात हल्लाबोल-संघर्ष यात्रेद्वारे शेतकरी, सर्वसामान्य जनता आणि कष्टकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या मागण्या सरकारपर्यंत पोचविण्यासाठी पवार यांनी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना निवेदन सादर केले.

गेल्या साडेतीन वर्षांत दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीटीसारख्या संकटाने ग्रासलेल्या शेतकऱ्याला सरकारने कोणतीच मदत केली नाही. त्यातून राज्यात 15 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. त्याही सरकार वेळीच पूर्ण करू शकलेले नाही. गारपिटीने द्राक्षे, कांदा, गहू, ज्वारी ही पिके हातची गेली. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाने राज्यातील, पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे. ऊस, सोयाबीन, तूर, कापूस, उडीद, मूग अशा कुठल्याच उत्पादनांना योग्य भाव नाही. अशा परिस्थितीत जगायचे कसे, असा सगळ्याच शेतकऱ्यांसमोर प्रश्‍न आहे. पश्‍चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात इतकी गंभीर परिस्थिती असतानाही सरकारची यंत्रणा ढिम्म असल्याचे चित्र आहे. या मागण्या तातडीने मान्य करण्यात याव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.