esakal | 'विद्युतदाहिनीतील राख थांबवण्यासाठी पुणे महापालिकेच्या उपाययोजना काय?'

बोलून बातमी शोधा

'विद्युतदाहिनीतील राख थांबवण्यासाठी पुणे महापालिकेच्या उपाययोजना काय?'
'विद्युतदाहिनीतील राख थांबवण्यासाठी पुणे महापालिकेच्या उपाययोजना काय?'
sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : देशात सध्या कोरोनाचं थैमान सुरु आहे. दुसऱ्या लाटेमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात चार लाख एक हजार 993 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 3 हजार 523 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहर आणि जिल्हा कोरोनाने बाधित जिल्ह्यांपैकी सर्वांत आघाडीवर असलेला जिल्हा आहे. पुण्यातील परिस्थिती देखील विदारक आहे. काल 152 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील 65 मृत्यू आहेत. या मृतांचे विद्युत दाहिनीतून अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मात्र, योग्य व्यवस्थापनाअभावी त्यातून होणाऱ्या प्रदुषणाबाबत तसेच महापालिकेच्या चुकीच्या प्राधान्यक्रमाबाबत आता ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी यांनी फेसबुक पोस्टद्वारे टीका केली आहे.

img

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, आज सकाळी साडे सहा वाजता आमच्या इमारतीच्या गच्चीवरून केलेलं हे शूटिंग. चिमणीतून काळाकुट्ट धूर बाहेर येतोय ती वैकुंठ स्मशानभूमीच्या विद्युत दाहिनीची चिमणी आहे. चिमणीची रूंदी तर कमी आहेच पण धूरासोबत जी राख बाहेर पडते ती थांबवण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही. परिणामी ही राख नवी पेठ, सदाशिव, नारायण, कर्वे रोड भागातील इमारतींवर जाऊन थांबत असणार. खूप काही रॉकेट तंत्रज्ञान लागत नाही. उत्तम दर्जाचे fly ash arrestors उपलब्ध आहेत बाजारात. कदाचित 15- 20 लाखांच्या बजेटमध्ये जे पुणे महापालिकेसाठी अगदीच किरकोळ आहे, असं त्यांनी म्हटलंय. यासोबत त्यांनी या धूराचा व्हिडीओ देखील फेसबुकवर पोस्ट केला आहे.

हेही वाचा: 'सत्य बोललो तर शीर कापलं जाईल'; अदर पुनावालांना बड्या हस्तींकडून धमक्या

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, इकडे कुठलंही कारण नसतांना तीनच वर्षांपूर्वी केलेले फुटपाथ तोडून नवे करताहेत कॅनाल रोडचे. काहीही गरज नसतांना. तिकडे स्मशानभूमीच्या चिमणीला प्रदूषण नियंत्रण करणारी यंत्रणा मात्र बसवू शकत नाहीत. वैकुंठला जाऊन आलात की कपड्यांना विशिष्ट वास येतो, तो या धुराचाच. तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय की राख संपूर्णपणे वेगळी करून तिचा बंदोबस्त करता येतो. पण प्रश्न प्राधान्यक्रमाचा आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.