धानोरीतील पूर व्यवस्थापनाचे काय झाले?

धानोरीतील पूर व्यवस्थापनाचे काय झाले?

पुणे, ता. ७ : धानोरी, कळस, वडगाव शेरी भागात कमी वेळेत जास्त पाऊस पडून प्रचंड नुकसान झाल्याने महापालिका प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी उपाययोजना करण्यासाठी तब्बल ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानंतरही यंदाच्या वर्षी या भागात मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली. पावसाळी गटार, नाले अपुरे पडल्याने रस्ते, सोसायट्यांमध्ये पाणी घुसले. त्यामुळे ५५ कोटी रुपयांच्या निधीतून या भागात काय कामे झाली? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.
पुणे शहरात मंगळवारी (ता. ४) जोरदार पाऊस पडला. याचा सर्वाधिक फटका धानोरी, विश्रांतवाडी, वडगाव शेरी, विमाननगर, खेसे पार्क, येरवडा, नगर रस्ता, कोरेगाव पार्क, पुणे स्टेशन, बंडगार्डन या भागांना बसला. सर्वच रस्ते पाण्याखाली गेले. अनेक ठिकाणी गुडघ्यापेक्षा जास्त पाणी जमा झाले. धानोरीतील मुख्य रस्त्यावर तर नदीप्रमाणे मोठा प्रवाह आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. अशीच स्थिती नोव्हेंबर २०२१मध्येही झाली होती. त्यावेळी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी या भागातील अडचणींचा पाढा वाचत प्रशासनाला धारेवर धरलेले होते. अपुरे पावसाळी गटार, नाल्यावरील अतिक्रमण, बांधकामासाठी नाले ९० अंशामध्ये वळविणे, नाल्यांची रुंदी कमी करणे, नाल्यांमध्ये भिंत बांधल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचेही त्यावेळी समोर आले होते.

एकत्रित माहितीचा अभाव
तीन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसानंतर पूर्व भागात ५५ कोटींचा निधी मंजूर केला. त्यातून नव्याने विकसित झालेल्या भागांत पावसाळी गटार टाकणे, सांडपाणी वाहिन्या टाकणे, कलव्हर्ट (नाल्यावरील पूल) मोठे करणे, नाल्यांची क्षमता वाढविणे, अशी कामे केली जाणार होती. त्यांपैकी विश्रांतवाडी-धानोरी रस्त्यावरील कलव्हर्ट मोठे करण्यात आले. काही भागात पावसाळी गटारांची कामे करण्यात आली आहेत. पण त्याची माहिती एकत्रितपणे प्रशासनाकडे उपलब्ध नाही. तसेच महापालिकेत आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांची बदली झाली. मलनि:सारण विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने नव्याने आलेल्या या अधिकाऱ्यांनी धानोरी, लोहगाव, येरवड्यात आलेल्या पुराबद्दल व त्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती नाही. अन्य अधिकाऱ्यांनी ही माहिती त्यांच्या निदर्शनास आणून दिलेली नाही.

असाही केला जातो दावा
२०१६ पासून शहरात कमी वेळात जास्त पाऊस पडण्याच्या घटना होत आहेत. त्यामुळे शहरात फेज १, २ आणि ३च्या माध्यमातून पाणी तुंबणाऱ्या सुमारे १७० ठिकाणांची यादी तयार करून कामे सुरू केली होती. त्यासाठी ५५ कोटी रुपयांचा निधी होता. तो केवळ धानोरी, लोहगाव या भागासाठी नव्हता, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात किती कामे झाली? कुठे झाली? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

दोन वर्षांत झालेली कामे
- धानोरी लक्ष्मीनगर सोसायटी येथे १२०० मिमी व्यासाची पावसाळी गटार टाकली
- मयूर किलबिल सोसायटी येथे बॉक्स कलव्हर्ट बांधले
- धानोरी पोलिस चौकी येथे १५० मीटर लांबीची, ५०० मिमी व्यासाची पावसाळी गटार टाकली
- मंगलदास रस्ता येथे पावसाळी गटार टाकली

यापूर्वी धानोरी भागात पूर आल्यानंतर नेमकी कोणती कामे केली आहेत, याची माहिती घेतली जाईल. या भागात पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका उपाययोजना करणार आहे.
- पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com