‘व्हॅलेंटाइन डे’च्या पार्श्‍वभूमीवर तरुणाईच्या काय आहेत प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

‘तनिष्का’चा प्रेम विशेषांक प्रसिद्ध 
‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘तनिष्का’ मासिकाचा ‘प्रेमोत्सव विशेषांक’ नुकताच प्रसिद्ध झाला. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने या अंकात प्रेमाची विविध रूपे मांडण्यात आली आहेत. हिंदी-मराठी मालिकांमधील एका अभिनेत्रीने पहिले प्रेम मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न, महाविद्यालयीन तरुणीचा प्रेमाचा अनुभव, स्त्रियांची बदलती प्रेमभाषा, आदिवासींचा प्रेमानुभव असे विषय युवक-युवतींना वाचायला आवडतील. आपल्या जवळच्या स्टॉलवर ‘तनिष्का’च्या फेब्रुवारीच्या अंकाची मागणी करा.

पुणे - गेल्या वर्षी म्हणजे आजच्याच दिवशी ‘व्हॅलेंटाइन डे’ला जम्मू-काश्‍मीर येथे जवानांवर हल्ला झाला होता. या घटनेची वर्षपूर्ती म्हणून हा काळा दिवस पाळायला हवा. त्यामुळे हा दिवस आपण साजरा का करायचा, असा प्रश्‍न बारावीत शिकणाऱ्या अभिनव गोरे याने उपस्थित केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अभिनव हा मूळ सोलापूरचा असून, शिक्षणासाठी पुण्यात आला आहे. सध्या तो स. प. महाविद्यालयात शिकत आहे. व्हॅलेंटाइन डे कसा साजरा करणार, त्यावर त्याने हे उत्तर दिले. तो म्हणाला, ‘‘प्रेमी युगलांसाठी व्हॅलेंटाइन डे महत्त्वाचा असतो; परंतु आपल्या जवानांच्या बलिदानाला विसरून चालणार नाही.’’ अभिनवप्रमाणेच अनेक विद्यार्थ्यांनी व्हॅलेंटाइन डे विषयीच्या विविध संकल्पना मांडल्या. ‘‘प्रेम व्यक्त करण्यासाठी फक्त व्हॅलेंटाइनच का हवा? आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी हा एकच दिवस असतो, असे नाही. खरं प्रेम वर्षातील ३६५ दिवस व्यक्त करता येते. फक्त आजचा दिवस साजरा केला म्हणजे आपले प्रेम खरे असते असे नाही, अशी मते तरुणांनी व्यक्त केली. 

विश्रांतवाडीतील लतिका चव्हाण म्हणाली, ‘‘मी गेल्या तीन वर्षांपासून ‘लाँग डिस्टन्स’ रिलेशनशिपमध्ये आहे. आमच्यासाठी सगळेच दिवस एकसारखे आहेत. प्रत्यक्षात भेट होत नसल्याने प्रेमाला व्यक्त करण्याचा फोन हा एकमेव पर्याय आहे.’’ 

महेश पाटील म्हणाला, ‘‘एकतर्फी प्रेमामुळे हिंगणघाटसारख्या घटना घडत आहेत, समाजात प्रेमाबरोबरच आदर आणि सन्मानाची भावना जागृत करण्याची गरज आहे.’

‘व्हॅलेंटाइन डे’मुळे पैसा आणि वेळ वाया जातो. आपल्या आवडत्या व्यक्तीवरील प्रेम सिद्ध करण्यासाठी भेट वस्तू नाही, तर वेळ देणे जास्त महत्त्वाचे आहे.
- संस्कृती देशमुख, विद्यार्थिनी, फर्ग्युसन महाविद्यालय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What reaches young people on the backdrop of Valentines Day