प्राथमिक शाळा कधी होणार सुरु ?

शिक्षकांबरोबरच पालकही उत्सुकता शिगेला
School
Schoolsakal
Updated on

पुणे : इयत्ता दुसरीत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी अद्याप शाळा पाहिलेली नाही, तर पहिलीत गेलेले अक्षर आणि अंक ओळख ऑनलाइनद्वारे करून घेत असल्याने त्यांनी अद्याप ‘शाळे’ची पायरी चढली नाही. शाळेत जाऊन शिकण्याचा आनंद विद्यार्थ्यांना घेता यावा, तसेच गेल्या १७ महिन्यांपासून होत असलेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याची गरज असल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे. तर विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकही सज्ज असल्याचे निरीक्षण शिक्षक नोंदवीत आहेत.

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची (सीईओ) शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतीच ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीदरम्यान दिवाळीनंतर इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याबाबत सकारात्मक वातावरण असल्याचे निरीक्षण जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी नोंदविले. शालेय शिक्षण विभागामार्फतही हे वर्ग सुरू करण्याबाबत चाचपणी आणि विचारविनिमय सुरू आहे.

याबाबत प्रातिनिधिक स्वरूपात काही शिक्षकांशी संवाद साधला असता, त्यांनीही देखील हे वर्ग तातडीने सुरू करण्याची गरज असल्याचे मत मांडले. पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष नंदकुमार सागर म्हणाले, ‘‘प्राथमिक शिक्षणात अक्षर ओळख आणि गणिती क्रिया विद्यार्थ्यांना योग्यरीत्या न कळल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. या वयात मुलांना आकलनशक्ती खूप असल्याने शिकविलेले त्यांना कळते. त्यामुळे इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा तातडीने सुरू होणे गरजेचे आहे. शिक्षक शाळा सुरू करण्याच्या तयारीत आहेत. तसेच पालकही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी होकार दर्शवीत आहेत. आता शाळांना राज्य सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.’’

सध्या शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग, तर ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत. दिवाळीनंतर शहरी भागात पाचवी ते सहावीचे वर्ग, तसेच पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याला परवानगी मिळावी, अशी मुख्याध्यापकांची मागणीआहे.

विद्यार्थ्यांवर झालेला परिणाम

  1. प्रत्यक्ष शिक्षण नसल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष

  2. स्मरणशक्ती आणि पाठांतर होतेय कमी

  3. अक्षर आणि अंक ओळख न होणे

  4. लिखाण अशुद्ध होणे, वाचन कमी

  5. मूलभूत ज्ञानापासून दुरावले विद्यार्थी

  6. प्रत्यक्ष शाळेतील अनुभवापासून अनभिज्ञ

इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याबाबत तुम्हाला काय वाटते? हे वर्ग सुरू व्हावेत का? याबाबत आपले मत आम्हाला पुढील व्हॉट्‌सॲप क्रमांकावर आपल्या नावासह पाठवावे.

व्हॉटस्‌ॲप क्रमांक : ८४८४९७३६०२

शालेय शिक्षण विभाग प्राथमिक वर्ग सुरू करण्याबाबत विचारविनिमय करत आहे, ही बाब स्वागतार्ह आहे. या वर्गातील मुलांच्या शाळा सुरू व्हाव्यात, याबाबत शिक्षक आणि पालकही आग्रही आहेत. या वयोगटातील विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरू होणे गरजेचे आहे.

- संजय सोमवंशी, मुख्याध्यापक,

सुंदरबाई मराठे विद्यालय, खराडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com