Pune : प्रशासन व लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या समस्या कधी सोडवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

प्रशासन व लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या समस्या कधी सोडवणार

पुणे : वीज महावितरण कंपनीने कोणतीही नोटीस न देता कृषी पंपाचा विद्युतपुरवठा बंद केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी २४ बाय ७ शेतामध्ये कष्ट करतो, तरीसुद्धा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी दुर्लक्ष का करीत आहेत, असा संतप्त सवाल शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी उपस्थित केला.

वालचंदनमगरमधील (ता. इंदापूर) महावितरण व पारेशन कंपनी कार्यालयात विशेष कार्यकारी अभियंता गणेश लटपटे यांना पवार यांनी शुक्रवारी (दि. १९ नोव्हेंबर २०२१) रोजी कृषि पंपाचा विद्युत पुरवठा तातडीने सुरू करण्यासंबंधी निवेदन दिले. याप्रसंगी महावितरणचे नाळे, पाटील, डी.ई. सुळ, डी.ई. गोफने व वालचंदनगर पोलीस स्टेशनचे बी. एन. लातुरे, हरिश्चंद्र चांदगुडे आणि शेतकरी, कष्टकरी उपस्थित होते. यावेळी पवार यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ट्रान्सफॉर्मचे कनेक्शन तातडीने जोडले नाही, तर वालचंदनगर पोलीस स्टेशनमध्ये देखील महावितरण व पारेशन कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करू असा इशारा दिला आहे. कृषी पंपाचा विद्युत पुरवठा सुरू केला नाही, तर बारामती शहरासह पुणे, ठाणे, मुंबई या शहराचा उद्यापासून पुरवठादेखील खंडित केला जाईल, याच्या परिणामाला महापरेशन व वितरण अधिकारी जबाबदार राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

loading image
go to top