कोण म्हणते संगीत नाटकाला गर्दी होत नाही : मेधा कुलकर्णी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ""कोण म्हणते संगीत नाटकाला गर्दी होत नाही? बालगंधर्वांनंतर काही काळ काळजी वाटली होती; पण नंतर छोटा गंधर्वांमुळे स्थिती सावरली. त्या छोटा गंधर्वांनीच संगीत दिलेल्या या नाटकाचे प्रयोग कित्येक वर्षांत होत नव्हते. माझ्याकडे याबद्दल कलावंत व रसिकांनी मागणी केल्यामुळे संबंधितांना सांगून हा योग जुळवून आणला.'' 

पुणे - "संगीत सुवर्णतुला' या विद्याधर गोखले यांनी लिहिलेल्या व स्वरराज छोटा गंधर्व यांनी संगीत दिलेल्या नाटकाच्या प्रयोगाला अलोट गर्दी झाली. ती पाहून माजी आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ""कोण म्हणते संगीत नाटकाला गर्दी होत नाही? बालगंधर्वांनंतर काही काळ काळजी वाटली होती; पण नंतर छोटा गंधर्वांमुळे स्थिती सावरली. त्या छोटा गंधर्वांनीच संगीत दिलेल्या या नाटकाचे प्रयोग कित्येक वर्षांत होत नव्हते. माझ्याकडे याबद्दल कलावंत व रसिकांनी मागणी केल्यामुळे संबंधितांना सांगून हा योग जुळवून आणला.'' 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुक्तछंद आयोजित आणि स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठान निर्मित "संगीत सुवर्णतुला' या नाटकाचे हे हीरकमहोत्सवी वर्ष आहे. या वेळी छोटा गंधर्वांच्या कन्या सुलभा सौदागर व शिष्या मधुवंती दांडेकर, बालगंधर्व रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर, अभिनेत्री निर्मला गोगटे, वंदना खांडेकर, अनुराधा राजहंस, अस्मिता चिंचाळकर, विनायक थोरात, चंद्रशेखर देशपांडे, प्रकाश भोंडे, हेमंत पेंडसे आदी उपस्थित होते. 

साखवळकर म्हणाले, ""छोटा गंधर्व यांनी हे नाटक उभे राहताना दोन दिवसांत सर्व पदांना चाली दिल्या होत्या.'' या नाटकाच्या पूर्वीच्या संचातील रुक्‍मिणीची भूमिका साकारणाऱ्या दांडेकर म्हणल्या, ""सुरवातीच्या प्रयोगांमध्ये रुक्‍मिणीला गाणी नव्हती. ती नंतर योजण्यात आली.'' 

अशोक अवचट यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाला सुचेता अवचट व चारुशीला केळकर यांनी संगीत दिले होते. यात तेजस मेस्त्री (नारद), चिन्मय जोगळेकर (कृष्ण), वेदवती परांजपे (सत्यभामा), वैजयंती जोशी (रुक्‍मिणी), निखिल केंजळे (बलराम), ऋतुपर्ण पिंगळे (महामंत्री), मोनिका असोलकर (चंपावती व राधा) यांनी भूमिका साकरल्या. संजय गोगटे (ऑर्गन), कार्तिकस्वामी दहिफळे (तबला), सविता सुपनेकर (व्हायोलिन) व चारुशीला केळकर (हार्मोनियम) यांनी साथ केली. 

"उजळीत जग मंगलमय', "अंगणी पारिजात फुलला', "तोची विश्‍वंभर विश्‍वाचा आधार', "तुज ना वंचियले', "श्रीरंगाच्या रमणी आम्ही,' यासारखी सुरेल नाट्यपदे व भावपूर्ण प्रसंगांमुळे या नाटकाने प्रेक्षकांची दाद मिळली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who says music plays are not crowded says medha kulkarni