Vidhansabha 2019 : बाप्पा कोणाला पावणार?

bjp-logo-hd-wallpaper-downl.jpg
bjp-logo-hd-wallpaper-downl.jpg

एकीकडे 'विघ्नहर्त्याच्या' आगमनाची तयारी धूमधडाक्‍यात सुरू असताना, राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची धांदलही तितक्‍याच उत्साहात सुरू आहे. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या या निवडणुकीसाठी पक्षांच्या, इच्छुकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या तयारीने जोर पकडला आहे. सध्या राज्यभरात मोठ्या प्रमाणावर 'इनकमिंग' असणाऱ्या भाजपचे पुण्यातील चित्र मात्र पूर्णपणे वेगळे आहे. शहरातील आठही जागा जिंकण्याचा आत्मविश्‍वास भाजपाला असल्याने, पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देऊन नेतृत्वाची पुढची पिढी घडविणार की विद्यमानांना पुन्हा संधी देऊन "सेफ खेळणार' याबाबत उत्सुकता आहे. 

या आठवड्यात पार पडलेल्या भाजप इच्छुकांच्या मुलाखतींची पार्श्वभूमीवर पक्ष कार्यकर्त्यांच्या विशेषतः नगरसेवकांच्या उंचावलेल्या अपेक्षांना न्याय देताना पक्षाला कसरत करावी लागणार हे नक्की. राज्यभरात सध्या भाजप इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. मुलाखतींची औपचारिकता सुरू असली, तरी विधानसभेच्या 90 टक्के जागांवरील उमेदवारांच्या नावांची यादी मुख्यमंत्र्यांकडे तयार असल्याचे पक्षाच्या वरिष्ठ गोटातून सांगण्यात येते. ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार कधीही विजयी झाला नाही, त्याठिकाणी विद्यमानांना पक्षात आणण्याचा कार्यक्रम सध्या जोरात आहे; पण आता अडचण झाली आहे, ती पक्षाकडे असणाऱ्या जागांवरच. ज्या जागा जिंकण्याची हमखास खात्री आहे, तेथे लोकसभेप्रमाणेच वेगवेगळे प्रयोग पक्षाकडून केले जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे विद्यमान 
आमदारांनाही यंदा आपल्यालाच उमेदवारी मिळेल याची खात्री नाही. 

पुण्यात आठ जागांसाठी झालेल्या मुलाखतीमध्ये तब्बल 103 जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. ज्याठिकाणी विद्यमान आमदार 'स्ट्रॉंग' आहेत, त्याठिकाणी इच्छुक साहजिकच कमी आहेत. मात्र, अनुकूल वातावरण असल्याने पहिल्यांदाच शहरातील 21 नगरसेवकांनी आमदार होण्याची इच्छा भाजपकडे व्यक्त केली आहे. यात महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, माजी उपमहापौर प्रसन्न जगताप आदींचा समावेश आहे. 

शिवाजीनगर आणि पुणे कँटोन्मेंटमध्ये इच्छुकांना यंदा बदल होतील, अशी अपेक्षा आहे, त्यामुळेच येथे भाजपमध्ये पहिल्यांदाच शिवाजीनगरमध्ये 32 आणि कॅंटोन्मेंटमध्ये 15 जणांनी निवडणुकीची इच्छा व्यक्त केली आहे. हे दोन्ही मतदारसंघ एकेकाळी कॉंग्रेसचे बालेकिल्ले होते. कॉंग्रेसकडे इथे सर्वाधिक इच्छुकांची संख्या असायची; पण गेल्या पाच वर्षांत बरोबर उलटी स्थिती झाली आहे. भाजपला या दोन्ही ठिकाणी उमेदवारी देताना बराच विचार करावा लागणार आहे. कॉंग्रेसकडे या दोन्ही ठिकाणी चांगले उमेदवार आहेत. 

पर्वतीमध्ये सर्वांत कमी चार अर्ज आले आहेत. हा मतदारसंघही भाजपसाठी सध्या खात्रीचा बनला आहे. लोकसभेत या मतदारसंघातून भाजपला मिळालेले मताधिक्‍य, नगरसेवकांची संख्या लक्षात घेता पक्ष कोणाला संधी देणार, याबाबत उत्सुकता आहे. 

पक्षाची खरी कसोटी लागणार ती कसबा विधानसभा मतदारसंघात. या मतदारसंघात खासदार गिरीश बापट यांचा वारसदार ठरविताना शह-काटशहसोबत संपूर्ण शहरातील जागांचे आखाडे, राजकीय समीकरणे तपासली जातील. शहरात किती महिलांना संधी द्यायची, जातीचा ताळमेळ बसतो का? मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे, बापट कोणाला ग्रीन सिग्नल देणार, असे अनेक घटक कसब्याचा उमेदवार निश्‍चित करताना पाहिले जातील. 

कोथरूडच्या बालेकिल्ल्यात चार विद्यमान नगरसेवक इच्छुक आहेत. भाजपच्या या सर्वांत सुरक्षित मतदारसंघासाठी स्पर्धा अधिक तीव्र आहे. भाजपला आपले आठही मतदारसंघ राखण्यासाठी काही प्रयोग निश्‍चित करावे लागतील. शहरात कॉंग्रेसकडे 53 जणांनी, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे 58 जणांनी उमेदवारी मागितली आहे. शहराबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट नाही. तर 'मनसे' काय करणार, हे गुलदस्तात आहे. "वंचित'चा प्रभाव कोणाला फायदेशीर ठरणार, हे पक्के आहे. 
त्यामुळे उमेदवारी वाटपात भाजपला अधिक काळजी घ्यावी लागेल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com