Vidhan Sabha 2019 : पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांची जागा घेणार कोण?

ज्ञानेश सावंत 
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदाची धुरा आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे गेल्यास पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदारकीची माळ आपल्याच गळ्यात पडावी, याचे डावपेच आखले जात आहेत.

पुणे : पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदाची धुरा आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे गेल्यास पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदारकीची माळ आपल्याच गळ्यात पडावी, याचे डावपेच आखले जात आहेत. महापालिकेतील कारभारी अर्थात, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे, नगरसेविका मानसी देशपांडे, डॉ. भरत वैरागे, गोपाळ चिंतल उमेदवारीच्या स्पर्धेत उतरले आहेत. दुसरीकडे मात्र, आमदारकीची हॅट्रीक करीत राज्यमंत्री मंडळात जाण्याचा आपला प्रयत्न फसणार नाही, याची पुरेपूर काळजी मिसाळ यांनी घेतली असून, शहराध्यपद सांभाळत आपले पर्वतीचे तिकिट कायम राहणार असल्याचा शब्द मिसाळ यांनी घेतल्याचेही बोलले जात आहे. 

भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष योगेश गोगावले यांची मुदत संपल्याने या पदावर मिसाळ यांची वर्णी लागणार असल्याचे पक्षाच्या राज्य पातळीवर नेत्यांनी जाहीर केले आहे. शहराध्यक्ष म्हणून मिसाळ यांची अधिकृत घोषणा होण्याची काही तासांचा अवधी असतानाच, आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळणार नसल्याचा अंदाज बांधला जात आहे. या निवडणुकीत शहराध्यक्ष या नात्याने मिसाळ यांनी आठही मतदारसंघात लक्ष घालावे लागणार आहे. तसेच, प्रचाराची धुराही सांभाळतानाच वरिष्ठ नेत्यांच्या सभांचेही नियोजन त्यांना करावे लागणार आहे. पक्षाची ताकद टिकविण्यासोबतचे ती वाढविण्याच्या दृष्टीने मिसाळ यांना झटावे लागणार आहे. त्यातच, पुढच्या तीन वर्षात म्हणजे, 2022 मध्ये महापालिकेच्या निवडणुका होतीत. त्याची वर्षेभर आधीच तयारी करावी लागणार असल्याने भाजपला आता पूर्णवेळ शहराध्यक्ष हवा असल्याचा सूत्र आहे. त्यामुळे मिसाळ विधानसभेची निवडणूक लढविणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. 
 

या पार्श्‍वभूमीवर पर्वतीतील त्यांची जागी पटकाविण्याचा इरादा भिमाले यांचा आहे. आपल्या राजकीय वाटेतून मिसाळ दूर होतील, असा एक विश्‍वास भिमालेंना असल्यानेच गेल्या काही दिवसांपासून ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पुण्याला पूर्णवेळ शहराध्यक्ष असावा, या मागणीसाठी ते आग्रही आहेत. त्याचवेळी कांबळेही इच्छुक मानले जातात. तर, मिसाळ भावजय नगरसेविका मानसी देशपांडे याही रिंगणात येण्याच्या तयारी आहेत. वैरागे, चिंतल यांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. 

पर्वतीतून मिसाळ या सन 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत निवडून आल्या आहेत. याआधी त्या सलग 10 वर्ष नगरसेविका होत्या. पक्षात त्या वजनदार नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे त्यांचे तिकिट कायम राहाणार की, केवळ शहराध्यक्षपदावरच त्यांना समाधान मानावे लागणार ? याची उत्सुकता पक्ष संघटनेत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who will replace at the place of MLa Madhuri misal At Parvati In Pune