पुणेकरांच्या खिशाला कात्री; का होतेय पेट्रोल- डिझेलच्या भावात वाढ?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

गेल्या काही दिवसात पेट्रोल-डिझेलचे दर दिवसागणिक वाढत आहेत. ''इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी निगडीत असल्यामुळे त्याचा परिणाम देशातील दरांवर होतो. आंतराष्ट्रीय बाजारपेठेत  पेट्रोल डिझेलचे दर कमी जास्त झाले की देशातीलही दर कमी जास्त होतो.

पुणे : पेट्रोल डिझेलचे भाव वाढतचे चालले आहेत. पुण्यात आज पेट्रोलचा एक लिटरचा दर 90 रुपये 99 पैसे झाला आहे तर डिझेलचा दर 80 रुपये 06 पैशांवर पोहचला आहे. पेट्रोलच्या दरात 24 पैशांनी वाढ झाली तर डिझेलच्या दरात 26 पैशांनी वाढ झाली आहे. सीएनजीचे एका किलोला 55 रुपये 50 पैशांवर पोहचला आहे.  देशांतर्गत बाजारात पैट्रोलचे दर वाढण्याचे मुख्य कारण आंतराष्ट्रीय बाजारात कृड ऑईलचे दर वाढणे ठरत असल्याचे समजते. यामध्ये आणखी वाढ होण्याची देखील शक्यता आहे.

गेल्या काही दिवसात पेट्रोल-डिझेलचे दर दिवसागणिक वाढत आहेत. ''इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी निगडीत असल्यामुळे त्याचा परिणाम देशातील दरांवर होतो. आंतराष्ट्रीय बाजारपेठेत  पेट्रोल डिझेलचे दर कमी जास्त झाले की देशातीलही दर कमी जास्त होतो. 2 दिवसांपुर्वी आंतराराष्ट्रीय बाजारात कृड ऑईलचा दर 60 डॉलर प्रतिबॅरल एवढा होता. त्याचाच परिणाम भारतातील दरांवर झाल्यामुळे सध्या दरवाढ झाली आहे.'' अशी माहिती ऑल इंडिया पेट्रोल डिसर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी सांगितले.

''पेट्रोल डिझेलचे दर वाढीचे दुसरे कारण म्हणजे महाराष्ट्र सरकारने एप्रिलमध्ये सेसच्या रुपात पेट्रोलच्या किंमतीत जवळपास 2 रुपयांची वाढ केली होती आणि लॉकडाऊन दरम्यान क्रूडच्या घसरत्या किंमतींचा फायदा घेण्यासाठी केंद्र सरकारने एप्रिल ते जून या काळात तीन वेळा उत्पादन शुल्क वाढविले आहे.” असेही त्यांनी सांगितले. ''केंद्र सरकारच्या उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे किंमती खाली येऊ शकतात असा अंदाज बऱ्याच वृत्तवाहिन्या वर्तविला होता. पण कर कमी करण्याच्या मुद्दय़ाबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाची अद्याप बैठक झालेली नाही. परंतु विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींचा प्रश्न सोडवे पर्यंत सामान्य नागरिकांना जास्तीत जास्त दिलासा देण्यासाठी यंत्रणा काम करीत आहे”

इंधन दरवाढीचा परिणाम देशातील सर्वच व्यापारांवर होत असतो. दरवाढीमुळे  वाहतूक खर्च वाढतो परिणामी सर्वच वस्तू महागतात. सर्व सामान्यांना मात्र याचा जोरदार फटका बसतो. त्यामुळे ही महागाई कमी करण्यासाठी इंधनाचे दर निंयत्रणात ठेवावेत अशी मागणी कायम सरकार पुढे येत असते. कृड ऑईलच्या आतंरराष्ट्रीय बाजाराचा अभ्यासा केला असता लक्षात येते की, वर्षातून 2 ते 3 वेळा अशा प्रकारे कृड ऑईलच्या दरामध्ये चढ-उतार होते. त्यामुळे देशातील महागाई कमी-जास्त होते.  

यापुर्वी देखील एकदा पेट्रोल 90  रुपयांवर गेले होते. मात्र, त्यानंतर दर कमी झाले होते. पण देशांतर्गत बाजारात पेट्रोल डिझेल स्वस्तात विक्री करायाचे झाले तर आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांमधील फरकामुळे आर्थिक नुकसान केंद्र सरकारच्या पेट्रोलियम कंपन्यांना सहन करावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात असे घडणे शक्य नाही. दरातील फरक पुर्वी 15 दिवसांनी बदलण्यास परवानगी होती. मात्र, या काळात कंपन्यांचे होणारे आर्थिक नुकसान घेऊन हा दर रोजच्या रोज बदल्याची पद्धत लागू करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या देशातील पेट्रोल डिझेल आणि सीएनजीचे दर रोजच बदलत आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लागत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why Petro Prize Rise in Pune