

प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा खून;
पत्नीसह प्रियकरास जन्मठेपेची शिक्षा
जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल; मृतदेह फेकला होता वाहत्या कालव्यात
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ६ : प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करणारी पत्नी व तिच्या प्रियकराला जिल्हा व सत्र न्यायाधीश राधिका शिंदे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. रंजना दादासाहेब पवार (रा. वय ३२, रा. हिवरे, ता. मोहोळ) आणि प्रियकर अमोल उर्फ कृष्णा अंगद पांढरे (वय २३, रा. कोन्हेरी, ता. मोहोळ) अशी त्या दोघांची नावे आहेत.
दुधाचा व्यवसाय करणाऱ्या कोन्हेरीच्या अमोल ऊर्फ कृष्णाची ओळख हिवरे येथील रंजनासोबत झाली, पुढे त्यांच्यात अनैतिक संबंध आले. पण, तिचा पती दादासाहेब हणमंत पवार (वय ३६) त्यांना अडसर ठरत होता. त्यामुळे दोघांनी २६ एप्रिल २०२३ रोजीच्या रात्री १० ते २८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी सव्वानऊपूर्वी दादासाहेबाला ठार मारले. प्रेत वाहत्या कालव्यात टाकले. प्रेत परमेश्वर पिंपरीतील (ता. मोहोळ) बशीर दगडू बागवान यांच्या शेताजवळील कालव्यातील पाइपला अडकले होते. बागवान यांनी पोलिस पाटील ज्योतिबा पाटील यांना कळवले. २८ एप्रिल २०२३ रोजी कामती पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली. यात पोलिस हवालदार जीवराज कासविद यांनी कामती पोलिसांत फिर्याद दिली होती. मृतदेहाची उत्तरीय चाचणी करून शिवबसव सामाजिक समितीतर्फे अंत्यविधी करण्यात आला. तपासावेळी पोलिसांनी संशयित अमोल ऊर्फ कृष्णा याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने प्रेयसी रंजनाच्या मदतीने तिच्या घराच्या अंगणात २६ एप्रिल २०२३ रोजी रात्री साडेअकराला दादासाहेबाचा झोपेत असताना खून केल्याचे सांगितले. प्रेत कालव्यात कोठे टाकले ते दाखवले. खून केल्यानंतर त्याने स्वत:च्या पिकअपमध्ये मृतदेह टाकून साक्षीदार अजय देवकतेकडे मदत मागितली होती, असेही समोर आले. गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक धनाजी खापरे, सुधीर खार्गे यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकारतर्फे ॲड. प्रदीपसिंह राजपूत यांनी युक्तिवाद केला होता. सरकारतर्फे २५ साक्षीदार तपासले. सुरुवातीचे काही साक्षीदार ॲड. माधुरी देशपांडे यांनी तपासले. शिक्षेच्या सुनावणीवेळी ॲड. आनंद कुर्डुकर यांनी काम पाहिले, तर आरोपीतर्फे ॲड. राज पाटील, ॲड. महेश सोलनकर, ॲड. स्नेहल राऊत यांनी काम पाहिले.
----------------------
चौकट
हातातील गोफ, कपड्यावरून
चुलत्याने ओळखला दादासाहेब
मयताचे काका गोविंद गुरूआप्पा पवार (रा. हिवरे) यांनी दादासाहेब बेपत्ता झाल्याची खबर मोहोळ पोलिसांत दिली होती. त्यावरून पोलिसांनी शोध सुरू केला होता. त्यावेळी कालव्यात वाहून आलेले प्रेत त्यांना दाखविण्यात आले. मृतदेहाच्या हातातील लाल-पिवळ्या रंगाचा गोफ आणि कपड्यावरून तो दादासाहेबच असल्याची खात्री झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.