चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून निर्घूण खून; आरोपी फरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder news

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून निर्घूण खून केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी महादेव सुरेश काळे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून निर्घूण खून; आरोपी फरार

शिरूर - चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तीचा निर्घूण खून केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी महादेव सुरेश काळे (मूळ रा. सोगाव पश्चिम, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे आज पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. खून करून काळे फरार झाला.

पतीने केलेल्या कुऱ्हाडीच्या हल्ल्यात ललिता महादेव काळे (वय ३२) हीचा मृत्यु झाला असून, तीच्या खूनप्रकरणी तीची बहिण चांदणी पवार हीने शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार : महादेव काळे व ललिता यांचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला होता. परंतू पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन महादेव हा तीला कायमच मारहाण करीत असल्याने काही दिवसांपूर्वी ती माहेरी टाकळी हाजी येथे आली होती. टाकळी हाजी जवळच म्हसेफाट्यावरील टेमकर वस्ती येथे ती आई व बहिणीकडे राहात होती. काही दिवसांपासून महादेव काळे हा देखील त्यांच्याकडे येऊन राहात होता. काल सायंकाळी पाचच्या सुमारास, महादेव व ललिता या पती - पत्नीत भांडण झाले. त्यावेळीही त्याने पत्नीला चारित्र्यावरून शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली होती.

दरम्यान, आज पहाटे महादेव काळे याच्या मोटारसायकलचा आवाज झाल्याने त्याची मेहुणी चांदणी पवार हिला जाग आली व तीने घराबाहेर येऊन पाहिले असता, तो मोटारसायकलवर दीड वर्षांच्या छोट्या मुलीला घेऊन घाईघाईने निघून गेल्याने तीला संशय आला. तीने आईला उठवून बहिणीच्या घराकडे गेली असता, घरात ललिता काळे हि रक्ताच्या थारोळ्यात, छिन्नविछीन्न अवस्थेत दिसून आल्याने त्यांनी टाकळी हाजी औटपोस्टमधील पोलिसांकडे धाव घेऊन त्यांना याबाबत कळविले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ललिता हिला सरकारी रूग्णालयात हलविले. मात्र, तत्पूर्वी तीचा मृत्यु झाला होता. चारित्र्याच्या संशयावरून महादेव काळे यानेच हा खून केल्याचा आरोप चांदणी पवार व तीच्या आईने केल्याने शिरूर पोलिसांनी त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.

दरम्यान, या भीषण खूनाच्या घटनेनंतर शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, उपनिरीक्षक सुनिल उगले यांनी घटनास्थळी भेट दिली. हल्लेखोर महादेव काळे याच्या मागावर पोलिस पथके रवाना केल्याचे पोलिस निरीक्षक राऊत यांनी सांगितले.

Web Title: Wife Murder By Husband Suspicion Of Character Accused Absconding Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..