ढेबेवाडी डोंगरपट्ट्यातील रब्बी हंगाम नामशेष च्या दिशेने
डोंगरपट्ट्यात ‘रब्बी’ नामशेष होण्याच्या दिशेने
ढेबेवाडीच्या दुर्गम निवी- कसणी परिसरातील स्थिती; वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव
ढेबेवाडी, ता. ७ : वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे अक्षरशः मेटाकुटीला आलेल्या विभागातील डोंगरपट्ट्यातील शेतकऱ्यांनी शेतीवरील लक्ष कमी केल्याने आणि अनेक कुटुंबे मुंबईला स्थलांतरित झाल्याने तेथील पिकाखालील क्षेत्र घटत चालले आहे. यंदाही रब्बी हंगामात त्याचा प्रत्यय आला. तेथील अनेक शिवारे सद्यःस्थितीला पेरणीविना पडूनच राहिली. हा उपद्रव पुढेही कायम राहिल्यास डोंगर भागातील रब्बी हंगामच नामशेष होण्याची भीती आहे.
सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील निवी, कसणी, निगडे, घोटीलसह वाड्यावस्त्यांलगत घनदाट जंगल आहे. वन्यप्राण्यांमुळे हानी पोहोचू नये म्हणून काही वर्षांपूर्वी अगदीच जंगलालगतची लोकवस्ती हलविण्यात आली असली, तरी अन्य शिल्लक गावांवर त्याचा विपरित परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अन्नाच्या शोधार्थ वन्यप्राण्यांनी त्या गावातील शिवारांकडे मोर्चा वळविल्याने शेती पूर्णपणे अडचणीत आली आहे.
निवी, कसणी परिसरात शेतकऱ्यांनी ऊस लागवड थांबविल्याने पूर्वी हंगामात रात्रंदिवस धगधगणारी गुऱ्हाळघरे विझली आहेत. रानडुक्करे आणि गव्यांचे कळप तोंडचा घास हिरावून घेत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी बेभरवशाच्या शेतीला रामराम ठोकून पोटापाण्यासाठी मुंबई गाठली असून, गावाकडीलही अनेक महिला-पुरुष शेतमजूर म्हणून ढेबेवाडी परिसरात दुसऱ्यांच्या शिवारातून राबताना दिसत आहेत. या सर्वाचा परिणाम डोंगरातील पिकाखालील क्षेत्रावर झाला असून, पडीक क्षेत्र वर्षागणिक वाढत आहे.
यंदा खरिपाच्या काढणीनंतर मोकळी पडलेली तेथील अनेक शिवारे पेरणीविना पडून राहिली. घातलेला खर्चही निघत नसेल, तर शेती न केलेलीच बरी अशीच काहीशी शेतकऱ्यांची भावना झाली आहे. डोंगर कपारीतील शेतकरी रब्बीत हरबरा, गहू, खपली, तूर, मसुरा, पावटा, तसेच वांगी, कांदे आदी पिके घेतात. यावर्षी मात्र अनेकांनी शेतीकडे पाठ फिरविल्याचे दिसते आहे. पुढच्या काळातही वन्यप्राण्यांचा उपद्रव कायम राहिल्यास डोंगर भागातील रब्बी हंगामच नामशेष होण्याची भीती आहे.
--------------
कोट
डोंगर भागातील शेतकरी वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीपासून. बाजूला गेला आहे, घातलेला खर्चही निघत नसल्याने शेती पाडून ठेवलेली बरी. अशी मानसिकता वाढल्याने प्रतिवर्षी पडीक क्षेत्र वाढतच आहे, रब्बीचा हंगाम तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
- मारुती पाटील, माजी अध्यक्ष,
संयुक्त वनव्यवस्थापन समिती, निवी.
-------------------
08172, 08173
१) निवी : रब्बीच्या पेरण्याविना पडून राहिलेली शिवारे.
२) मारुती पाटील
------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

