राण डुकरांमुळे नुकसान

राण डुकरांमुळे नुकसान
Published on: 

शेतशिवारात रानडुकरांचा
हैदोस; कपाशी जमिनदोस्त

(फोटो आहे)

ॲग्रोवन वृत्तसेवा
आर्णी, यवतमाळ : पावसाच्या अनियमिततेमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता रानडुकरांच्या उपद्रवाचे नवे संकट उभे ठाकले आहे. रात्रीच्या वेळी रानडुकरांचे कळप शेतात घुसून उभ्या कपाशीच्या झाडांची नासधूस करीत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

खरीप हंगामात पावसाच्या खंडामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला. दुबार पेरणी, फवारणी आणि मशागतीच्या वाढीव खर्चाचा भार सहन करीत शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक जोपासले. काही शेतांमध्ये बोंडे लागल्याने उत्पादनाची आशा निर्माण झाली असतानाच रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत रानडुकरांचे कळप शेतात घुसतात. कपाशीच्या ओळींमधून फिरताना झाडे मुळासकट उखडणे, फांद्या मोडणे आणि उभे पीक जमिनीवर लोळविण्याचे प्रकार घडत आहेत.

सकाळी शेतात गेल्यानंतर जमिनीवर पडलेली कपाशीची झाडे आणि विस्कटलेले पीक पाहून शेतकऱ्यांना मोठा धक्का बसत आहे. दिवसभर कष्ट करून जोपासलेले पीक काही तासांत उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. बियाणे, खते, फवारणी आणि मजुरीसाठी झालेला खर्च वसूल होण्याची शाश्वती नसताना वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीची भर पडली आहे.

रानडुकरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री शेतात जागरण करावे लागत आहे. त्यामुळे शेतीची कामे आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना त्यांची दमछाक होत आहे. दुष्काळसदृश परिस्थिती आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना रानडुकरांच्या उपद्रवाचा अतिरिक्त फटका सहन करावा लागत आहे. या प्रकाराची वनविभागाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

---- चौकट ---
वनविभागाने तातडीने दखल घ्यावी
रानडुकरांच्या उपद्रवामुळे नुकसान झालेल्या शेतांची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत. पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसानभरपाई मिळवून द्यावी, तसेच रानडुकरांचा उपद्रव रोखण्यासाठी कायदेशीर व प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

--- फोटो ---B20875
यवतमाळ : रान डुकरांच्या हैदोसामुळे कपाशीचे लोक नुकसान होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.