पाहा डायनॉसोरचे दात, दुर्मीळ खनिजे, जीवाश्‍म

Wild-India-Mahotsav
Wild-India-Mahotsav

तुम्हाला डायनॉसोरचे दात बघायचे आहेत? त्याची हाडे बघायची आहेत? तर मग या तुम्ही थेट फर्ग्युसन महाविद्यालयात. येथे आयोजित केलेल्या ‘वाइल्ड इंडिया चित्रपट महोत्सवा’मध्ये आयोजित प्रदर्शनात हे तुम्हाला पाहता येणार आहे; तसेच वन्यजीवांची मुद्रा असलेली नाणीदेखील पाहण्याची संधी तुम्हाला यात मिळेल.

नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट, फर्ग्युसन महाविद्यालय आणि महाराष्ट्र राज्य वनविभाग वन्यजीव (पश्‍चिम) यांच्यातर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून ‘सृष्टी फाउंडेशन’ आणि ‘ॲड-व्हेंचर फाउंडेशन’ हे याचे सहआयोजक आहेत. याअंतर्गत भारतातील अत्यंत दुर्मीळ खनिजे आणि जीवाश्‍म व वन्यजीवनाची मुद्रा असलेली नाणी, स्टॅंपचे प्रदर्शनही येत्या शनिवारी (ता. २४) आणि रविवारी (ता. २५) फर्ग्युसन महाविद्यालयात भरविण्यात येणार आहे. ते सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत विनामूल्य खुले आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या हस्ते शनिवारी सकाळी दहा वाजता होईल. 

याबाबत माहिती देताना संग्राहक महोमंद फसिउद्दीन मक्की म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात विविध प्रकारची खनिजे सापडतात. ती वेगवेगळ्या रंगांतील आहेत; तसेच देशात आणि जगभरातील खनिज येथे पाहायला मिळणार आहेत. यात डायनॉसोरचे दात, अस्थी, माशाचे जिवाश्‍म, असे वेगवेगळे प्रकार तुम्हाला पाहता येणार आहेत.’’

याबाबत एस. आर. भट म्हणाले, ‘‘जगातील वेगवेगळ्या देशांतील वेगवेगळे पक्षी, प्राणी, मासे यांची मुद्रा असलेल्या नाण्यांचे संकलन केले आहे. त्याचे प्रदर्शन येथे भरविण्यात आले आहे.’’

आवर्जून पहावे असे माहितीपट
रविवारी (ता. २५) वेळ - सकाळी १० 
स्थळ - फर्ग्युसन महाविद्यालय, ॲम्फी थिएटर
एशियाटिक लायन ऑन अ रोल कॉल 
(निर्मिती - प्रवीण सिंग)
भारतात फक्त गीर राष्ट्रीय उद्यानात आढळणाऱ्या आशियाई सिंहाच्या बाबतीत असलेल्या प्रश्नांवर प्रकाश टाकणारा हा माहितीपट. आशियाई सिंहांना काही भवितव्य आहे का, यावरही या माहितीपटात चर्चा केली आहे.

गॅंबलिंग ऑन एक्‍सटींशन (निर्मिती - जेकब निसर) (आंतरराष्ट्रीय विभाग)
तस्करांच्या टोळीला अटकाव करण्यासाठी तपास यंत्रणेने आखलेली योजना, ती अमलात आणण्यासाठी केलेले उपाय आणि त्यातून राजकीय व्यक्तींशी असणारा त्यांचा संबंध यावर प्रकाश टाकणारा हा माहितीपट.

नॉर्थ ईस्टर्न डायरीज (निर्मिती - संदेश कडूर)
काझीरंगा या व्याघ्रप्रकल्पाची विविधता दाखवणारा हा माहितीपट.जैवविविधतेवर भाष्य करणारा हा वन्यजीव चित्रपट.

रविवारी (ता. २५) वेळ - दुपारी ३.३० 
स्थळ - फर्ग्युसन महाविद्यालय, ॲम्फी थिएटर
ज्वेल्स ऑफ ठाणे क्रीक 
(निर्मिती - सब्यासाची पात्रा)
ठाणे जिल्ह्यात असलेली खाडी ही वन्यजीवांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची परिसंस्था. येथील प्रदूषणामुळे या खाडीवर आणि पर्यायाने येथील जीवांवर होणारा विपरीत परिणाम यावर या माहितीपटातून प्रकाश 
टाकलेला आहे.

थंबलीना द स्टोरी ऑफ ख्रिस्तमस फ्रॉग (निर्मिती - अश्विका कपूर)
मेघालयात आढळणाऱ्या  दुर्मीळ अशा ख्रिस्तमस फ्रॉग या अंगठ्याच्या पेराच्या आकाराएवढ्या बेडकाविषयी माहिती देणारा हा वन्यजीव चित्रपट. पावसाळ्यात पार्श्वसंगीतासारखा एक वेगळ्या प्रकारचे संगीत देणारा त्यांचा आवाज आणि या बेडकांचे पर्यावरणातील महत्त्व याविषयी या चित्रपटातून माहिती सांगितली आहे.

ताडोबा बफर - द अनएक्‍स्प्लोअर्ड विल्डरनेस (निर्मिती - किरण घाडगे)
विदर्भाचे रत्न म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ताडोबा व्याघ्रप्रकल्पाच्या बफर जंगलाचे सौंदर्य दर्शवणारा हा माहितीपट. जंगलाचा मुख्य भागात वाघांची असलेली लक्षणीय संख्या, त्यामुळे बफर जंगलाचे अधोरेखित होणारे महत्त्व आणि ताडोबाच्या बफर जंगलाची श्रीमंती याविषयी माहिती या वन्यजीव माहितीपटातून दिली आहे.

ऑपरेशन सुमात्रन ऱ्ह्रायनो (निर्मिती - क्रिस अन्नादोराई) (आंतरराष्ट्रीय विभाग)
मलेशियातील लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या सुमात्रन गेंड्यांना वाचवण्याच्या दृष्टीने बोर्निओ ऱ्ह्रायनो अलायन्स (बोरा) या वन्यजीव स्वयंसेवी संस्थेने घेतलेल्या कष्टांची माहिती देणारा हा माहितीपट.

ट्रेजर्स ऑफ ग्रासलॅंड (निर्मिती - मिहीर गोडबोले)
पुणे येथील तरुण निसर्ग अभ्यासक मिहीर गोडबोले आणि मकरंद डंबारे यांनी बनवलेल्या ‘ट्रेझर्स ऑफ ग्रासलॅंड’ या गवताळ प्रदेशातील वन्यजीवनावर बनवलेल्या माहितीपटातून त्यांनी लांडग्यांच्या एका टोळीचा घेतलेला मागोवा आणि त्याचा अभ्यास यावर या माहितीपटात अतिशय सुंदररीत्या माहिती दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com