कास - वनव्यांमध्ये होरपळू लागले डोंगर....

कास - वनव्यांमध्ये होरपळू लागले डोंगर....
Published on

वणव्यामध्ये होरपळू लागले डोंगर

वनसंपदेचे नुकसान; वन विभागाकडून कारवाईची मागणी

कास, ता. ४ : उन्हाळ्याच्या झळा तीव्रपणे जाणवू लागल्या असून, या उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये जावळी तालुक्यात हिरव्यागार असलेल्या डोंगररांगा वणव्यांमध्ये होरपळू लागल्या असून, या कडक उन्हाळ्यात निसर्ग जावळी तालुक्यातील हिरवाईची होरपळ होऊ लागली आहे.

उन्हाळ्याची चाहूल लागली, की रोज कोणत्या ना कोणत्या डोंगरावर लाल भडक ज्वाला दिसत असतात. काही समाजकंटक गैरसमजुतीपोटी डोंगरांना आगी लावतात, त्यामुळे डोंगरातील पशुपक्षी यांची घरटी, अंडी तसेच सरपटणारे प्राणी व इतर प्राण्यांचा निवारा नष्ट होण्याबरोबरच जीवन साखळीतील अनेक घटक नष्ट होतात. त्याचबरोबर डोंगरातील छोटी-मोठी झाडेझुडपे जळून खाक होतात, यातून निसर्गाचा मोठा ऱ्हास होण्याबरोबरच वनसंपदेचे प्रचंड नुकसान होते. तरीही दरवर्षी न चुकता डोंगरांना वणवे लावले जातातच. त्यामुळे अशा लोकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी निसर्गप्रेमींकडून होत आहे.


वणव्यांबाबत गैरसमज
वणवा लावला, की त्या ठिकाणी कोवळे गवत लगेच उगवून येते, असा गैरसमज असल्याने शेतकरी वणवे लावतात, तर सद्यःस्थितीत वन्यप्राणी घराजवळ आल्याने व शेतीचे नुकसान करत असल्याने त्यांचा गावाजवळचा निवारा नष्ट व्हावा, म्हणून काही लोक जाणीवपूर्वक वणवे लावत आहेत. वणव्यांबाबत असलेल्या गैरसमजामुळे वणवे लावून निसर्गाचा नाश केला जात आहे.

वन विभागाकडून जागृतीची गरज
उन्हाळा सुरू झाल्याने वणव्यांचे सत्र सुरू झाले असून, वन विभागाने लोकांमध्ये जाऊन वणवे लावू नयेत, यासाठी प्रबोधन करणे गरजेचे आहे, तसेच ज्या ठिकाणी वणवा लागला असेल त्या ठिकाणी जाऊन वणवा विजवण्यासाठीही पुढाकार घेणे आवश्यक आहे, तसेच जे कोणी वणवे लावत आहेत, त्यांचा शोध घेण्यासाठी गाव पातळीवर खबऱ्यांचे जाळे वाढवून अशा लोकांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत, त्यावेळी वणवा लावणारी प्रवृत्ती नष्ट होणार आहे.

वणव्यांमुळे वन्यप्राणी वस्तीत
हल्ली प्रत्येक गावात रानगवे माकडे व इतर अन्य वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आल्याचे दिसत आहे. शेतातील गहू, हरभरा, भुईमूग आधी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. जंगलांना लावलेल्या आगींमुळे जंगलात खाद्य उपलब्ध नसल्याने हे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळू लागले असून, मानव व वन्यजीव संघर्ष तीव्र होताना दिसत आहे.

पिण्याच्या पाण्याची समस्या
डोंगरात लागलेल्या आगींमुळे डोंगरातील झरे, तळी, ओढे यातील पाणी झपाट्याने कमी होऊ लागले असून, वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावू लागली आहे. त्यातूनच हे प्राणी पाण्याच्या शोधात जंगल सोडून इतरत्र भटकताना दिसत आहेत. यातून अवैध शिकारीला खतपाणी मिळत आहे.


04666
कुसुंबी : परिसरातील डोंगरांना मोठ्या प्रमाणात वणवे लावल्याने वनसंपदेचा ऱ्हास होत आहे. (अर्चना पवार ः सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com