आजपासून रंगणार वन्यजीव चित्रपट महोत्सव 

Tiger1
Tiger1

पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँफी थिएटरमध्ये गुरुवार (ता. 22) पासून वन्यजीव चित्रपट महोत्सव होणार आहे. त्याचे उद्‌घाटन प्रसिद्ध वन्यजीव चित्रपटकार शेकर दत्तात्री यांच्या हस्ते संध्याकाळी सहा वाजता होईल. या अंतर्गत शुक्रवारी (ता. 23) वन्यजीव चित्रपटकार नल्ला मुत्थू यांच्याशी अभिनेता सुयश टिळक संवाद साधणार आहेत. त्यातून मुत्थू यांचा जीवनपट उलगडेल. 

नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट, फर्ग्युसन महाविद्यालय आणि महाराष्ट्र राज्य वनविभाग वन्यजीव (पश्‍चिम) यांच्यातर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून सृष्टी फाउंडेशन आणि ऍड-व्हेंचर फाउंडेशन हे याचे सहआयोजक आहेत. आपण एखादा माहितीपट नॅशनल जिओग्राफीसारख्या वाहिन्यांवर बघतो, त्या वेळी आपल्या मनात त्या माहितीपटाविषयी अनेक प्रश्‍न निर्माण होतात. माहितीपट बनवण्याची प्रक्रिया, त्यामागचा विचार अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे मुत्थू यांच्या मुलाखतीतून पुणेकरांना मिळतील. ही मुलाखत शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. 

शेकर दत्तात्री हे भारतातील प्रसिद्ध वन्यजीव चित्रपटकार असून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना वन्यजीव माहितीपटांसाठी गौरविले आहे. शेकर हे वन्यजीव संरक्षण व संवर्धन या विषयांवर चित्रपट निर्मितीला भारतात सुरवात करणाऱ्या जुन्या चित्रपटकारांपैकी आहेत. त्यांच्या "रेस टू सेव्ह अमूर फाल्कन' या वन्यजीव चित्रपटात ईशान्य भारतात स्थलांतर करून येणाऱ्या "अमूर फाल्कन' या पक्ष्यावर भाष्य केले आहे. येथे या पक्ष्याची मोठ्या प्रमाणावर शिकार होत असे. पण, या चित्रपटामुळे या पक्ष्याच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न केले गेले आणि होणाऱ्या शिकारीला आळा बसला. या चित्रपटासारख्या त्यांनी निर्मिती केलेल्या काही इतर चित्रपटांमुळेही निसर्ग संवर्धन आणि संरक्षणासाठी विशेष प्रयत्न करण्यास सुरवात झाली.

"इंडियाज डीसअपिअरिंग बीचेस', "चिल्का- ज्वेल ऑफ ओडिशा', "द ट्रुथ अबाऊट टायगर्स', "सेव्ह अवर शोलास', "द रिडलेज लास्ट चान्स', "मॉन्सून- इंडियाज गॉड ऑफ लाइफ', "सायलेंट व्हॅली- ऍन इंडियन रेन फोरकास्ट' अशा वन्यजीव माहितीपटांची निर्मिती त्यांनी केली आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या काही कामांची क्षणचित्रे दृकश्राव्य माध्यमातून पाहण्याची संधी या महोत्सवाच्या निमित्ताने निसर्गप्रेमींना मिळणार आहे. 
 

आवर्जून पाहावे असे माहितीपट 
शुक्रवार (ता. 23) ः वेळ ः सायंकाळी पाच 


स्पिती अ वाईल्डलाईफ हेवन (निर्मिती ः विनोद बारटक्के) : 
या वन्यजीव माहितीपटात स्पिती, हिमाचल प्रदेश येथे आढळणाऱ्या काही दुर्मीळ वन्यजीवनाचे चित्रण करण्यात आले आहे. यात हिमबिबट्या, तिबेटियन लांडगा, रेड फॉक्‍स, आयबेक्‍स, ब्लू शिप, गोल्डन ईगल अशा वन्यप्राणी आणि पक्ष्यांचे चित्रीकरण आहे. यातील काही वन्यप्राणी हे फक्त याच भागात आढळतात. 

लाइफ फॉर लाईव्हज्‌ (निर्मिती ः रोशनी रोज) :
कन्नन नावाच्या एका वन मजुराची ही कथा असून, या माणसाचा निसर्ग संरक्षण आणि संवर्धन या विषयीचा ध्यास दाखवला आहे. केरळातील पेरियार व्याघ्र प्रकल्पात हा वन मजूर 35 वर्षे काम करत असल्यामुळे त्याची या जंगलाशी नाळ जोडली गेली आहे. त्याचं या जंगलाविषयीचं प्रेम आणि वन विभागातर्फे जंगल वाचवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न यावर भाष्य केले आहे. 

क्‍लॅश ऑफ टायगर्स (निर्मिती ः एस. नल्ला मुत्थू) (नल्ला मुत्थू यांच्या प्रकट मुलाखतीनंतर) :
हा चित्रपट एका व्याघ्रकुटुंबावर आधारित आहे. रणथंभोरमधील "कृष्णा' नावाची वाघीण या चित्रपटाची प्रमुख सूत्रधार आहे. आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करताना चार बछड्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची वेळ "कृष्णा'वर येते आणि यात तिचा एक बछडा मरण पावतो. उरलेल्या तीन बछड्यांत दोन बहिणी आणि त्यांचा एक भाऊ यांना कृष्णा नेटाने मोठी करत असताना त्यांच्या कुटुंबावर एक संकट उभं ठाकतं. हे संकट आणि त्याचबरोबर कुटुंबातील अंतर्गत सत्तासंघर्ष आणि कृष्णाची त्यामुळे लागलेली कसोटी याचं सुरेख चित्रण नल्ला मुत्थू यांनी या चित्रपटातून केलं आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com