पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील लढणार कसब्यातून?

अमोल कविटकर
गुरुवार, 25 जुलै 2019

कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला असून बापट यांचे गेली 25 वर्षे निर्विवाद वर्चस्व आहे. त्यामुळे जर चंद्रकांत पाटील यांनी कसब्यातून लढण्याचा निर्णय घेतलाच तर पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी बापट यांच्यावरच येणार आहे. शिवाय इच्छुकांची संख्या अधिक असल्याने भाजपअंतर्गत होऊ शकणारे शह-काटशाहचे राजकारण पाटील यांच्या उमेदवारीमुळे टळू शकणार आहे.

पुणे : गिरीश बापट हे पुण्यातून लोकसभेवर निवडून गेल्यानंतर कसब्याचा उत्तराधिकारी कोण, यावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. विशेष म्हणजे 'माझ्या उमेदवारीबाबत पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल', असे पाटील यांनी नुकतेच पुण्यात बोलताना सांगितले होते.

कसब्यासाठी महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक हेमंत रासने, धीरज घाटे यांच्यासह स्वीकृत नगरसेवक आणि चंद्रकांत पाटलांचे निकटवर्तीय गणेश बीडकर यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र थेट प्रदेशाध्याक्षच कसब्यातून चाचपणी करत असल्याची माहिती पुढे आल्याने इच्छुकांचे 'इच्छा' आपसूकच विरली जाणार आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला असून बापट यांचे गेली 25 वर्षे निर्विवाद वर्चस्व आहे. त्यामुळे जर चंद्रकांत पाटील यांनी कसब्यातून लढण्याचा निर्णय घेतलाच तर पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी बापट यांच्यावरच येणार आहे. शिवाय इच्छुकांची संख्या अधिक असल्याने भाजपअंतर्गत होऊ शकणारे शह-काटशाहचे राजकारण पाटील यांच्या उमेदवारीमुळे टळू शकणार आहे.

पाटील यांची राजकीय कारकीर्द गेल्या पाच वर्षांत बहरत असताना 'लोकांमधून निवडून यावं' अशी टीका त्यांच्यावर सातत्याने होत आहे. त्याचमुळे की काय गेल्या वर्षभरापूर्वी यापुढे कोणतीही निवडणूक न लढण्याची जाहीर केलेली भूमिका पाटील यांनी बदलत 'पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारेन' अशी नवी भूमिका जाहीर केली आहे. पाटील हे पुण्याचे पालकमंत्री असून जर कसब्यातून ते लढले आणि निवडून आले तर त्यांच्याकडेच पालकमंत्रीपदाची जबाबदारी कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे पुण्याचा नेतृत्त्वाचा मुख्यमंत्र्यांना सतावणारा प्रश्न आपोआप सुटणार आहे. दुसरीकडे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातूनही पाटील निवडणूक लढवण्याची चर्चा आहे. मात्र कसब्यासारखा 'सेफ' मतदारसंघ शोधून पाटील राज्यभर प्रचारासाठी 'मोकळे' राहू शकतील, त्यामुळे ते कसब्यातूनच निवडणूक लढू शकतात, असा कयास बांधला जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Pune Guardian Minister Chandrakant Patil fight from Kasba Vidhan Sabha Constituency