पुण्यात मोबाईल फेकून मारल्याने फुटले महिलेचे डोकं

ब्रिजमोहन पाटील
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

मोबाईलमुळे मानसिक स्वास्थ्यावर होणारे दुष्परिणाम नेहमीच ऐकतो. मोबाईलच्या आहारी गेल्याने होणाऱ्या घटना ऐकतो, पण मोबाईल फेकुन मारल्याने जखमी झाल्याचा प्रकार तुम्ही ऐकला आहे का? पुण्यात एका महिलेला मोबाईल फेकून मारल्यामुळे जखमी झाल्याची घटना घडली आहे.

पुणे : मोबाईलमुळे मानसिक स्वास्थ्यावर होणारे दुष्परिणाम नेहमीच ऐकतो. मोबाईलच्या आहारी गेल्याने होणाऱ्या घटना ऐकतो, पण मोबाईल फेकुन मारल्याने जखमी झाल्याचा प्रकार तुम्ही ऐकला आहे का? पुण्यात एका महिलेला मोबाईल फेकून मारल्यामुळे जखमी झाल्याची घटना घडली आहे. भर रस्त्यावर शिवीगाळ करणाऱ्या तरुणाला शिव्या कशाला देतो असे विचारणाऱ्या महिलेचा राग आल्याने त्याने महिलेला जोरात मोबाइल फेकून मारला. त्यात जखमी झालेल्या महिलेच्या डोक्यात सहा टाके घालण्याची वेळ डाॅक्टरांवर आली. 

अरबाज परवेज सय्यद (वय२४) याला अटक केली आहे. अफसाना वलीअल्ला खाजी (वय ३५, दोघे रा.सय्यदनगर गल्ली क्रमांक १४) असे जखमी महिलेचे नाव आहे. खाजी यांनी यासंदर्भात वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व आरोपी सय्यद हे एकाच भागात रहायला आहेत, त्यांची ओळख आहे. मंगळवारी दुपारी अफसाना या गप्पा मारत उभ्या होत्या, त्यावेळी सय्यदने 'ए थोडा आवाज कम कर के बात कर' असे म्हणून त्यांना शिवीगाळ सुरू केली. अफसाना यांनी 'शिव्या कशाला देतो' असा जाब विचारल्याने त्याने जोरात मोबाइल फेकून मारला. तो अफसाना यांच्या डोक्यात बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. रुग्णालयात दाखल केले असता, त्यांना सहा टाके घालण्यात आल्याचे डाॅक्टरांनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी सय्यदला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार संजय तावरे करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a womans head injured due to Mobile thrown in Pune