

सासवड, ता. ६ : राज्य परिवहन महामंडळाने महिलांच्या ५० टक्के प्रवास सवलतीसाठी आवश्यक ''एनसीएमसी'' कार्डच्या सक्तीला ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. नोंदणी प्रक्रिया अपूर्ण असल्याने महिलांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती सासवड आगारप्रमुख वृषाली तांबे यांनी दिली.
राज्य शासनाने महिलांसाठी एसटी प्रवासात ५० टक्के सवलत योजना लागू केली आहे. डिजिटल प्रवासाला चालना देण्यासाठी महामंडळाने १ ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत राज्यभरात सुमारे एक कोटी १० लाख महिलांची नोंदणी झाली आहे. परंतु, विशेषतः ग्रामीण भागातील अनेक महिलांपर्यंत माहिती न पोहोचल्याने किंवा तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी पूर्ण होऊ शकलेली नाही. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन महामंडळाने ७ ऑक्टोबरपासून ही अट शिथिल केली असून, महिलांना ३१ डिसेंबरपर्यंत जुन्या ओळखपत्रांच्या आधारे सवलतीचा लाभ घेता येणार आहे.
या मुदतवाढीच्या काळात गाव पातळीवर विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करून १०० टक्के कार्ड वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, प्रवासी संघटना आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन महिलांना नोंदणीसाठी मदत करावी, असे आवाहन सासवड आगारप्रमुख वृषाली तांबे यांनी केले आहे.
‘‘३१ डिसेंबरनंतर सवलतीसाठी डिजिटल कार्ड अनिवार्य असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सासवड व पुरंदर तालुक्यातील महिला प्रवाशांनी जवळच्या एसटी आगारात किंवा आयोजित शिबिरांमध्ये जाऊन लवकरात लवकर आपले एनसीएमसी कार्ड काढून घ्यावे,’’ असे आवाहन आगार प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.