

महिला कृषी शक्ती
पुरस्काराची घोषणा
१५ सप्टेंबरपर्यंत महिला व संस्थांना नामांकनाची संधी
ॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक : शेती, अन्नप्रणाली, जैवविविधता संवर्धन, हवामान बदल, पोषण सुरक्षा आणि ग्रामीण परिवर्तनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला तसेच महिलांच्या नेतृत्वाखालील संस्थांना राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यासाठी ‘महिला कृषी शक्ती पुरस्कार २०२६’ची घोषणा करण्यात आली आहे. एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन आणि जेएसडब्ल्यू यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
इच्छुकांनी १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत नामांकन सादर करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ग्रामीण महिलांचे ज्ञान, श्रम, नेतृत्व आणि नवकल्पनांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा पुरस्काराचा प्रमुख उद्देश आहे. शेती व शेतीपूरक व्यवसाय, अन्नप्रणाली, जैवविविधता संवर्धन, हवामान-लवचिक शेती, पोषण सुरक्षा आणि ग्रामीण उपजीविकेसाठी प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना या माध्यमातून राष्ट्रीय ओळख मिळणार आहे. पुरस्कारासाठी ‘बियाणे, जैवविविधता आणि पारंपरिक ज्ञान’, ‘हवामान लवचिकता आणि पर्यावरणीय संवर्धन’ आणि ‘पोषण सुरक्षा आणि ग्रामीण उपजीविका’ या तीन प्रमुख श्रेणी निश्चित करण्यात आल्या आहेत. याशिवाय नेतृत्व तसेच महिलाकेंद्रित नवकल्पना व तंत्रज्ञानातील उल्लेखनीय कार्यासाठी ‘भूमी जा राष्ट्रीय सन्मान’ हा विशेष सन्मान दिला जाणार आहे.
भारतीय नागरिक असलेल्या १८ वर्षांवरील महिला पुरस्कारासाठी पात्र आहेत. शेती, शेतीपूरक क्षेत्र किंवा ग्रामीण उपजीविकेत किमान पाच वर्षांचे उल्लेखनीय योगदान, सातत्यपूर्ण परिणामकारक कार्य, नेतृत्व, नवकल्पना किंवा समुदायसेवेचा अनुभव अपेक्षित आहे. अपवादात्मक प्रस्तावांमध्ये पाच वर्षांची अट शिथिल करण्याचा अधिकार पुरस्कार आयोजकांना आहे. महिला नेतृत्वाखालील संस्थांनाही नामांकन करता येणार आहे.
पुरस्कार विजेत्यांना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख पुरस्कारासह राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी तसेच तज्ज्ञ व संस्थांच्या नेटवर्कशी जोडण्याची संधी मिळणार आहे. अधिक माहितीसाठी mahila.krishishakti@mssrf.res.in या ई-मेलवर किंवा ०४४-२२५४१२२९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.