सुवासिनींचे वडाकडे अखंड सौभाग्यासाठी साकडे

गणेश बोरुडे
बुधवार, 27 जून 2018

तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे परिसरातील वटपौर्णिमेनिमित्त सुवासिनींनी नटूनथटून वडाला फेरे मारत साकडे घालून अखंड सौभाग्यासह पतीच्या निरामय दीर्घायुष्याचे दान मागितले.

तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे परिसरातील वटपौर्णिमेनिमित्त सुवासिनींनी नटूनथटून वडाला फेरे मारत साकडे घालून अखंड सौभाग्यासह पतीच्या निरामय दीर्घायुष्याचे दान मागितले.

पावसाने उघडीप दिल्याने सुवासिनींनी सकाळपासूनच भरजरी साड्या, दागिने घालून नटून थटून वटवृक्षाला धागा बांधून फेरे मारत मनोभावे पूजा केली. नोकरदार महिलांनी वडाच्या फांद्या घरी आणून पूजा करत जन्मो जन्मी हाच पती मिळू दे, अशी प्रार्थना केली. आधुनिकतेच्या जमान्यातही तितक्याच पारंपरा जपत शास्त्रोक्त पध्दतीबरोबरच मोठ्या श्रद्धेने वटपौर्णिमा झाली. तळेगाव ते स्टेशन रस्त्यावर तसेच जोशीवाडी रिंगरोडसह पुणे-मुंबई महामार्गावरील वडाच्या झाडाखाली जुन्या नव्या पिढीतील महिला एकत्रितपणे उत्साहाने ही वडाची पूजा करताना दिसून आल्या. उपस्थित सौभाग्यवतींना वाण देऊन ओट्या भरल्या. हिरवा चुडा, हळकुंड, बदाम, सुपारीसह आणि आंब्याचे फळ वडाला अर्पण केले.

पोलिसांची सतर्कता आणि महिलांची जागरुकता

गतकाळातील अनुभव आणि सोनसाखळी चोरांचा ताप लक्षात घेता तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, स.पो.नि. कुंदा गावडे, उपनिरिक्षक भोसले आणि सहकाऱ्यांनी परिसरात गस्त घालून पुजेसाठी बाहेर पडलेल्या महिलांना सोनसाखळी चोरांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले. सोशल मिडीयावरील आवाहनांमुळे महिला जागरुक राहिल्याने सायंकाळपर्यंत कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
 

Web Title: women are celebrating vatpornima festival