महिला, मुलींचा सुंदर दिसण्यासाठी आयुर्वेदाकडे कल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ayurved

गेल्या दोन वर्षांत त्वचा आणि केसांची काळजी हे महिलावर्गात अत्यंत महत्त्वाचे विषय झाले आहेत. त्वचेची काळजी, केसांची निगा राखण्याबरोबर निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक आहारालाही प्राधान्य दिले जात आहे.

महिला, मुलींचा सुंदर दिसण्यासाठी आयुर्वेदाकडे कल

पुणे - गेल्या दोन वर्षांत त्वचा आणि केसांची काळजी हे महिलावर्गात अत्यंत महत्त्वाचे विषय झाले आहेत. त्वचेची काळजी, केसांची निगा राखण्याबरोबर निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक आहारालाही प्राधान्य दिले जात आहे. कोरोना या साथीच्या रोगाने आयुर्वेदाचे महत्त्व पटवून दिले आहे. त्यामुळे औषधोपचारापासून ते ब्यूटी प्रॉडक्ट्सपर्यंत आयुर्वेदिक वस्तूंच्या वापराकडे मुली व महिलांचा कल आहे.

लग्नसोहळा, अन्य कार्यक्रम किंवा ऑफिसची मीटिंग अशा सर्व प्रसंगांसाठी प्रत्येक जण आपले व्यक्तिमत्त्व खुलून दिसावे, यासाठी प्राधान्य देतात. कोरोनाकाळात ‘वर्क फ्रॉम होम’ आणि लॉकडाउनमुळे अनेकांना याची तशी गरज भासली नव्हती. परंतु, आता याकडे गांभीर्याने पाहिले जात असून, आयुर्वेदिक स्किन केअर उत्पादनांचा वापर त्वचेची उत्तम निगा राखण्यासाठी उपयुक्त असल्याची मानसिकता महिलावर्गात निर्माण होत आहे.

सद्यःस्थिती काय?

  • आयुर्वेदाबाबत जागरूकता वाढली

  • त्वचेसाठी रासायनिक स्किन केअर उत्पादनांचा वापर कमी

  • लॉकडाउनमुळे स्किन केअरसाठी नैसर्गिक, घरगुती उपायांवर भर

वनौषधींबाबत विश्‍वास

आयुर्वेदिक उत्पादन क्षेत्रातील मोना पंडित म्हणाल्या, ‘स्किन केअरसाठी हर्बल व आयुर्वेदिक उत्पादनांची मागणी वाढली आहे. आयुर्वेदिक स्किन केअरचे उत्पादने वापरल्यास त्याचा फरक जाणवायला थोडा वेळ लागतो. आता चित्र बदलत असून नामांकित कंपन्यांच्या वस्तू न वापरता महिला वेगवेगळ्या आयुर्वेदिक ब्रँडचे उत्पादन वापरत आहेत.’’

घरगुती उपायांचा वापर

लॉकडाउनमध्ये पार्लर, स्पा व सलून बंद असल्यामुळे हेअरकट, हेअर स्पा, फेशिअल, क्लीनअप, थ्रेडिंग, वॅक्सिंग आदीच्या गैरसोयीमुळे बऱ्याच महिलांनी नैसर्गिक व घरगुती उपायांना प्राधान्य दिले. त्वचेसाठी हळद, चंदन, कोरपड, नारळाचे तेल, मुलतानी माती अशा वस्तूंच्या वापरावर मुली आणि महिलांनी भर दिल्याचे पार्लर चालकांनी सांगितले.

आयुर्वेदामध्ये पथ्य पाळणे अत्यंत गरजेचे आहे, तसेच त्वचा किंवा केस यांची योग्य काळजी घेण्यासाठी वर-वरचे उपाय किंवा प्रॉडक्ट वापरणे हा पर्याय नसून. योग्य जीवनशैली आणि आहार महत्त्वाचा आहे. यात बदल झाल्यावर मग अशा समस्या उद्‌भवतात. सध्या बरीच आयुर्वेदिक उत्पादने उपलब्ध आहेत आणि महिला त्यांचा वापर करतात.

- डॉ. अनघा दिघे, आयुर्वेद डॉक्टर

एअर होस्टेस असल्यामुळे मला चेहऱ्याची काळजी घ्यावी लागते. अशात सतत मेकअप केल्याने चेहऱ्यावर मुरुमची समस्या अधिक जाणवू लागली. त्यामुळे आईच्या सल्ल्यानुसार आता केवळ आयुर्वेदिक उत्पादनांचा चेहऱ्यावर वापर करते. त्याचबरोबर हळद, कोरपड यांचा वापर घरातल्या घरात आठवड्यातून दोनदा नक्कीच करते.

- रितू करोसिया