"कारपूलिंग'ला महिलांची पसंती 

अक्षता पवार
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील आयटी, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचारी "कारपूलिंग'ला अधिक प्राधान्य देत आहेत.

पुणे - दररोज कंपनीमध्ये वेळेत पोचायचे आहे, मात्र पीएमपीमधील गर्दी, खासगी वाहन नेण्यात वाहतूककोंडीचा मनस्ताप, प्रदूषण आणि त्यातही खिशाला लागणारी कात्री, हे सगळे टाळण्यासाठी सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील आयटी, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचारी "कारपूलिंग'ला अधिक प्राधान्य देत आहेत. सुरक्षित व परवडणाऱ्या दरात हा प्रवास होत असल्यामुळे महिला व त्यांचे कुटुंबीयही त्याबाबत निर्धास्त राहात आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मागील काही वर्षांत "आयटी हब', "उद्योगनगरी' अशी जगभरात ओळख पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांना मिळाली. याच शहरामधील हिंजवडी, खराडी, मगरपट्टा यांसारख्या मोठ्या आयटी पार्क, आयटी कंपन्यांसह अन्य कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये पुरुषांइतक्‍याच महिलाही वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या या महिला अधिकारी व कर्मचारी प्रारंभी नोकरीला जाण्यासाठी खासगी वाहन किंवा पीएमपी किंवा अन्य सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत होत्या. मात्र गर्दी, वेळेची उपलब्धता व अन्य कारणांमुळे आता "कारपूलिंग' सारख्या नावीन्यपूर्ण पर्यायास प्राधान्य देत आहेत. याबाबत खासगी कॅब सेवा पुरविणाऱ्या "क्विकराईड' या कंपनीने देशभातळीवर सर्वेक्षण केले आहे. 

कारपूलिंग म्हणजे काय ? 
ऑफिस अथवा कॉलेजला जाण्याचा मार्ग एकच असेल, तर अशा वेळी खासगी वाहनांचा वापर करण्याऐवजी तीन ते चार जणांनी एकत्रित येऊन एकाच चारचाकी वाहनातून जाणे म्हणजेच कारपूलिंग होय. मोबाईलच्या माध्यमातून याचे बुकिंग केले जाते. 

पुणे शहर देशात तिसरे 
देशातील तब्बल 45 टक्के महिला विविध कारणांसाठी कारपूलिंगचा वापर करतात. त्यामध्ये पुणे शहर तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे आम्ही केलेल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून पुढे आले आहे. कारपूलिंगमध्ये सुरक्षितता हे मुख्य कारण आहे. तसेच दिवसभर आपल्या खासगी वाहनांची काळजी घेण्याचाही प्रश्‍न नाही. शहरात सरासरी 11 किलोमीटर कारपूलिंग करण्यात येत असून 10 किमीच्या प्रवासाला 33 मिनिटे इतका वेळ लागतो, अशी माहिती "क्विकराईड'चे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एन. एम. राव यांनी दिली. 

लोहगावपासून मगरपट्टा या भागात जाण्यासाठी मी कारपूलिंगचा वापर करते. यामुळे माझे प्रवासाचे निम्मे पैसे वाचतात. ऑफिसमधून घरी जाण्यासाठी उशीर होतो तेव्हाही हा पर्याय मला उत्तम व तितकाच सुरक्षित वाटतो. 
- नेहा परवीन अंसारी, कर्मचारी, केपीओ कंपनी. 

कारपूलिंगचे फायदे 
* खासगी वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण 
* कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण 
* खासगी वाहनांच्या पार्किंगचा प्रश्‍न निर्माण होत नाही 
* इंधनाची बचत व हरित पर्यावरणाचा उत्तम संदेश 

(क्विकराईड सर्व्हे 2018-2019 नुसार) 
देशातील पहिल्या चार प्रमुख शहरांमधील महिला "कारपूलर' 
शहर - महिला कार-पूलर यांची टक्केवारी 
केरळ - 51 टक्के 
बंगळूर - 45 टक्के 
पुणे - 42 टक्के 
चेन्नई - 40 टक्के 

पुण्यातील कारपूलिंगची वर्षभरातील आकडेवारी 
(क्विकराईडच्या सर्वेक्षणानुसार) 
कारपूलिंगचा वापर करणाऱ्यांची संख्या - 3 लाख 
किती किमीपर्यंत - 1.5 कोटी किमी 
कार्बन उत्सर्जन प्रतिबंध - 3 हजार 500 टन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women Prefer Carpooling