महिलांविषयीच्या कायद्यांबाबत सजग रहा

महिलांविषयीच्या कायद्यांबाबत सजग रहा

Published on

उंडवडी, ता. ४ : बऱ्हाणपूर (ता. बारामती) येथील डेलोनिक्स सोसायटी संचलित बारामती कॉलेज ऑफ फार्मसी येथे महिलांच्या हक्कांबाबत कायदेशीर जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘‘अंतर्गत तक्रार समितीचे कायदेशीर पैलू व महिला तक्रार निवारण व्यवस्था’’ या विषयावर विशेष परिसंवाद उत्साहात पार पडला. महिला तक्रार निवारण कक्ष, लैंगिक छळ प्रतिबंध समिती व अंतर्गत तक्रार समिती यांच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून ॲड. स्नेहा भापकर, ॲड. अपूर्वा डोंबे, ॲड. कल्पना साळुंखे (बारामती न्यायालय) उपस्थित होत्या. मान्यवरांनी कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भातील कायदे तसेच कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध अधिनियम २०१३ मधील तरतुदी, अंतर्गत तक्रार समितीची रचना, कार्यपद्धती व तक्रार निवारण प्रक्रियेतील नियम याविषयी मार्गदर्शन केले.
ॲड. भापकर यांनी विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांना आपल्या कायदेशीर हक्कांची जाणीव करून देत तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया स्पष्ट केली. ॲड. डोंबे यांनी अंतर्गत तक्रार समितीची जबाबदारी, गोपनीयतेचे महत्त्व व निष्पक्ष चौकशीची आवश्यकता अधोरेखित केली. ॲड. कल्पना साळुंखे यांनी महिलांविरुद्ध होणाऱ्या अन्यायाविरुद्ध उपलब्ध कायदेशीर उपाययोजना सांगत आत्मविश्‍वासाने पुढे येण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सक्षम वातावरण उपलब्ध करून देणे ही संस्थेची प्राथमिक जबाबदारी असल्याचे नमूद केले.

Marathi News Esakal
www.esakal.com