

महिला ऊसतोड कामगारांच्या
तपासणीची जबाबदारी घ्यावी
डॉ. नीलम गोऱ्हे; जिल्हा रुग्णालयात बैठक
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १३ ः जिल्ह्यात ३३ हजार ऊसतोड कामगार हंगामासाठी येत आहेत. त्यांच्या कुटुंबातील महिलांच्या आरोग्यासाठी व उपचारासाठी कॅम्प लावा, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.
येथील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात नीलम गोऱ्हे यांनी आरोग्य खात्याच्या योजनांबद्दल आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात या महिन्यात ऊसतोड हंगाम सुरू होईल. मराठवाड्यातून व अन्य भागातून अंदाजे ३३ हजार कामगार ऊसतोडीसाठी येत आहेत. त्यातील महिला कामगारांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे लागेल. यापूर्वी या महिलांच्या गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे हे प्रकार होणार नाहीत, यासाठी यंत्रणा सज्ज व्हावी. तसेच त्यांच्या आरोग्यासाठी विशेष कॅम्प लावावेत. जिल्ह्यात गर्भलिंग चाचणी कायद्याअंतर्गत पाच गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांचे निकाल लवकर लावण्याच्या दृष्टीने पाठपुरावा केला जावा.
चौकट
माढा, करमाळा व सांगोल्याचे कौतुक
जिल्ह्यातील माढा, करमाळा व सांगोला तालुक्यातील मुलींच्या जन्माचे प्रमाण मुलांच्या तुलनेत अधिक झाल्याची नोंद झाली आहे. ही बाब कौतुकास्पद असल्याचे श्रीमती गोऱ्हे यांनी सांगितले.
चौकट
एक किंवा दोन मुलींच्या पालकांचे समुपदेशन
समाजात एक किंवा दोन मुली असलेल्या पालकांना विशेष समुपदेशन सेवा दिली जावी. त्यांनी आहे त्या अपत्यावर समाधान मानावे. अन्यथा मुलगा होण्याच्या आशेने केलेल्या प्रयत्नाने किंवा नंतरच्या गर्भपाताने आईच्या आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. त्यासाठी या पालकांचे समुपदेशन करून त्यांना आरोग्याविषयी जागरूक करण्याची गरज आहे. त्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांची नेमणूक करावी, असे सुचवले आहे.